क्षेत्र अधिकारी १५ हजारांची लाच स्वीकारतांना जाळ्यात
खासगी पंटर ताब्यात ; जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई

जळगाव I लोकशाही न्यूज नेटवर्क
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) जळगावात कारवाई करत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी (वर्ग-२) राजेंद्र पांडुरंग सुर्यवंशी (वय ४२) आणि त्यांचा साथीदार खाजगी व्यक्ती मनोज बापू गजरे यांना १५,००० रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
रावेर येथील एका हॉस्पिटलच्या बायो-वेस्ट प्रमाणपत्रासाठी सुर्यवंशी यांनी त्रुटी दाखवून लाच मागितल्याचा प्रकार उघड झाला. तक्रारदाराने नाशिक कार्यालयातून प्रमाणपत्र मिळवले होते. त्यानंतर जळगाव कार्यालयात अर्ज मागे घेण्यासाठी गेल्यावर सुर्यवंशी यांनी १५,००० रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदाराने ACB कडे तक्रार नोंदवली.
ACB ने २४ सप्टेंबर २०२५ रोजी सापळा रचला. सुर्यवंशी यांच्या सूचनेनुसार गजरे याने तक्रारदाराकडून १५,००० रुपये स्वीकारले. त्यानंतर दोघांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई ACB च्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.


