पूर्ववैमनस्यातून घडले हत्याकांड : रेल्वेत फिल्मी स्टाईल कारवाई
चोपडा – शहरातील धरणगाव रोडवरील पाटचारीजवळ झालेल्या प्रदीप राजेंद्र महाजन माळी यांच्या निर्घृण खून प्रकरणाचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या 24 तासांत यश आले आहे. मुंबईला पळून गेलेल्या दोन्ही आरोपींना नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून अत्यंत शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
प्रदीप राजेंद्र महाजन (वय 33 वर्षे, रा. तारामती नगर, चोपडा) यांचा दि. 19 एप्रिल रोजी रात्री 9 ते 20 एप्रिल रोजी सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास चेहरा आणि डोके अज्ञात हत्याराने ठेचून खून करण्यात आला होता. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा केल्यानंतर संशयित आरोपी विजय भास्कर वैदकर (रा. भाग्योदय नगर, चोपडा), निर्मल संजय बडगुजर (रा. चिंच चौक, चोपडा) हे फरार झाले होते. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ते मुंबईला गेल्याचे निष्पन्न झाले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ मुंबईकडे रवाना झाले. दरम्यान, आरोपी दादर येथून रेल्वेने पुन्हा जळगावकडे येत असल्याची माहिती मिळाली. पथकाने नाशिक रेल्वे स्थानकावरून जळगावकडे येणाऱ्या रेल्वेत बसून शोध सुरू केला आणि नाशिक ते चाळीसगाव दरम्यान धावत्या रेल्वेतून दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. संशयित आरोपींना चोपडा येथे आणून चौकशी केली असता, सुरुवातीला त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता, मयत प्रदीप महाजन याचे आरोपी विजय वैदकर याच्याशी पूर्ववैमनस्य असल्याने संगनमताने हा खून केल्याची कबुली त्यांनी दिली. संशयित आरोपी चेतन सुभाष कानडे याच्या सांगण्यावरून हे कृत्य केल्याची माहितीही समोर आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात सोपान गोरे, जितेंद्र वल्टे, रवींद्र पाटील, दीपक माळी, विलेश सोनवणे, विष्णू बिन्हाडे, सुनील दामोदरे, रावसाहेब पाटील, रिजवान शेख, चोपडा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पवन देसले, चेतन परदेशी यांचा समावेश होता.



