अयान पठाण जेव्हा अभिनव शाळेसाठी गणेश मूर्ती आणतो…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

मुस्लिम समाजात अल्लाहचे रूप निराकारी आहे. व हिंदू धर्मात प्रत्येक देविदेवतांना एक मूर्त स्वरूप आहे. अगदी दोन टोकांच्या या धर्म पद्धतीला संवेदनशीलतेला आनंद देत, धर्माची भिंत ही श्रद्धा आणि लोकसहभागात आडवी येत नाही अशा सहिष्णु वृत्तीचा आदर्श इयत्ता नववीतील अवघ्या १५ वर्षांच्या आयन मझहर खान पठाण या विद्यार्थ्याने घालून दिला. माहेश्वरी विद्याप्रसारक संस्थेच्या अभिनव माध्यमिक शाळेचा हा विद्यार्थी आहे. आपल्या समोर या लहानग्याने सर्वधर्म समभाव या उक्तीचे ज्वलंत उदाहरण समोर ठेवले आहे.

कोरोना महामारीमुळे दोन वर्षे शाळेतील सण-उत्सव निर्बंधात साजरे होत होते. मात्र परिस्थिती पूर्ववत झाल्याने सर्वच निर्बंध हटविले आणि गणेशोत्सवाला दुपटीने उत्साहाची भरती आली. पूर्वी शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी वर्गणी गोळा करून उत्सव साजरा करीत असत. यावर्षी मुख्याध्यापक सौ. सरोज तिवारी यांनी वर्गणी न घेता शिक्षक-पालक-विद्यार्थी यांच्या सहभागातून उत्सव साजरा करायचे ठरविले. अगदी मूर्तीपासून तर पूजेचे व सजावट साहित्य ज्याला जमेल त्यांनी द्यावे असे ठरवले गेले.

नववीच्या वर्गशिक्षिका सौ. निता पाटील यांनी वर्गातील मुला-मुलींना उत्सवाची संकल्पना सांगितली. त्यावर आयान खान पठाण याने, ‘मैम मी मूर्ती देतो !’ असे उत्साहाने सांगितले. सौ. पाटील यांनीही होकार दिला. आयानने वडील मझहर खान पठाण व अम्मीला शाळेतील संकल्पना सांगितली. त्यांनीही ते मान्य करून मूर्ती द्यायला तयार झाले.

शाळेत गणेशाची मूर्ती द्यायची तर ती आणावी लागेल. मझहर खान यांचे नातेवाईक (चुलत सासरे) अयुबखान ताजखान पठाण हे गेली २०/२२ वर्षे वेगवेगळ्या देवादिकांच्या मूर्तीचे आणि त्यावर रंगकाम करतात. आयान खानला गणेशाची मूर्ती हवी हे कळल्यानंतर त्यांनी गणेशाची आकर्षक मूर्ती तयार करून दिली. आज आयान खान याने मोठ्या उत्साहाने शाळेत गणरायाची मूर्ती आणली. त्या मूर्तीची वाजत-गाजत शाळेत मिरवणूक निघाली. अभिनव विद्यालयाने नक्कीच हे अभिमानास्पद पाऊल आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.