मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांच्याबाबत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अनेक टीका टिप्पणी होतांना दिसत आहेत. याप्रकरणावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DYCM Devendra Fadnavis) यांनी अब्दुल सत्तार यांचा समाचार घेत चांगलाच सल्ला दिलाय. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे तक्रारदेखील केली.
काय म्हणाले फडणवीस ?
यासंदर्भात देवेंद्र फडणवीसांनी चेंबूरमध्ये बोलताना भूमिका स्पष्ट केली आहे. “कुणीही महिलांबद्दल अपशब्द काढू नयेत. ते अतिशय चुकीचं आहे. आम्ही त्याचा विरोधच करू. पण जसं आमच्या कडच्यांना ते लागू आहे, तसंच ते त्यांच्याकडच्यांनाही लागू आहे. पण मला आज त्याच्यात जायचं नाहीये”, सत्तार चुकले. पण खोक्यांची भाषा योग्य नाही. राजकारणामध्ये बोलण्याची पातळी खूप खाली चालली आहे. सगळीकडच्या लोकांनी आचार संहिता पाळली पाहिजे. मोठ्या नेत्यांनी आपल्या लोकांना सांगितलं नाही, तोवर हे शक्य नाही, असे विधान करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांची चांगलीच कानउघडणी केली.
काय म्हणाले होते सत्तार ?
औरंगाबादमध्ये एका वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींशी बोलताना सत्तार यांना सुप्रिया सुळेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही सुप्रिया सुळेंना खोके देण्याची ऑफर केल्यावरुन त्यांनी तुमच्याकडे आले असतील खोके म्हणूनच तुम्ही खोके देण्यासाठी तयार झाला आहात, असं म्हटलं आहे. यावर काय सांगाल असं सत्तार यांना विचारण्यात आलं. या प्रश्नावर सत्तार यांनी सुप्रिया सुळेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना शिवी घातली. “इतकी भिकार** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही देऊ,” असं उत्तर सत्तार यांनी दिलं.