धक्कादायक; आरोग्य सेवकास अटक… विनयभंग व ऍट्रॉसिटी अंतर्गत कारवाई…

0

 

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत आरोग्य उपकेंद्रातील आरोग्य सेवकाने आशा वर्करचा विनयभंग केल्याची घटना 14 सप्टेंबर रोजी सकाळी घडल्याची उघडकीस आली आहे. याबाबत सायंकाळी उशिरा तालुका पोलीस ठाण्यात आरोपी आरोग्य सेवकावर विनयभंगाचा तसेच ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वकवाड येथील 30 वर्षीय आशावर्कर असलेल्या महिलेने तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असता, आरोपी आरोग्य सेवक महेश देवराम ईशी रा. शिरपुर याला पोलिसांनी अटक केली आणि गुरुवारी दुपारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील वकवाड आरोग्य उपकेंद्रा अंतर्गत आरोग्य कर्मचारी व आशावर्कर यांच्या मार्फत गावात कुष्ठरोग, क्षयरोग, गरोदर माता सेवा व ईतर आरोग्य संदर्भात सर्वे करण्यात येत असतांना, 14 सप्टेंबर रोजी सकाळी करण्यात आलेल्या सर्वेत पिडीत आशा वर्कर महिलेने चुकीचे काम केल्याचे फोनवरून सांगून पुन्हा नव्याने सर्वे करण्यासाठी दुपारी बारा वाजेच्या सुमारास आरोग्य सेवक महेश ईशी याने आरोग्य उपकेंद्रात बोलावून घेतले.

दरम्यान उपकेंद्रातील क्लिनीक रुममध्ये चुकीचा सर्वे केल्याबद्दल समजावीत असतांना आरोग्य सेवक महेश ईशी याने स्त्री मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याची तक्रार सदर आशावर्कर महिलेने तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

दाखल तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात विनयभंगासह अट्रोसिटीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश आहेर हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.