जळगाव एमआयडीसीत शुभम पॉलिमर्स कंपनीला भीषण आग; लाखोंचे नुकसान
जळगाव (प्रतिनिधी) : शहरातील एमआयडीसी भागात सकाळच्या सुमारास शुभम पॉलिमर्स या कंपनीला भीषण आग लागून तीन यंत्रसामग्री, वायरींग, कच्चा माल आणि सीसीटीव्ही कॅमेरे जळून खाक झाले. ही घटना ६ एप्रिल रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास एम ९५ सेक्टरमधील कंपनी परिसरात घडली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
शुभम पॉलिमर्स ही प्लास्टिक प्रॉडक्ट्स तयार करणारी कंपनी असून, नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक कंपनीच्या एका भागातून धुराचे लोट निघू लागले. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. कंपनीत उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांनी तातडीने बाहेर धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांनी अथक प्रयत्न करत काही तासांत आग आटोक्यात आणली.
या आगीत तीन यंत्रसामग्री, चार मशिनरींचे वायरींग, मोठ्या प्रमाणात कच्चा माल आणि पाच सीसीटीव्ही कॅमेरे जळून गेले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कंपनीचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे.
या प्रकरणी शुभम देविदास धांडे (वय २७, रा. जानकी नगर, जळगाव) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.