आगीचे तांडव: अवैध नाइट क्लबमध्ये २५ जणांचा मृत्यू

0

आगीचे तांडव: अवैध नाइट क्लबमध्ये २५ जणांचा मृत्यू

गोव्यात मध्यरात्रीची दुर्घटना; राष्ट्रपती, पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

पणजी वृत्तसंस्था : राज्याची राजधानी पणजीपासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावरील अरपोरा परिसरात असलेल्या ‘बर्च बाथ रोमियो लेन’ या कथित अवैध नाइट क्लबमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या प्रचंड आगीत तब्बल २५ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. आग लागताच क्लबमध्ये हाहाकार माजला आणि कर्मचारी तसेच पर्यटक जीव वाचवण्यासाठी धावाधाव करू लागले.

आग भडकण्याचे प्रमुख कारण सुशोभीकरणासाठी वापरलेली नारळ व ताडाच्या झाडांच्या फांद्या असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. पहिल्या मजल्यावर आग लागून ती क्षणार्धात पसरली. क्लबमध्ये गर्दी प्रचंड आणि बाहेर पडण्याचा मार्ग अरुंद असल्याने अनेक जणांना पलायन करता आले नाही.

काही लोकांनी जीव वाचवण्यासाठी तळघरात शरण घेतले; मात्र तिथे धुराचा घनदाट प्रकोप झाल्याने अडकलेल्या अनेकांचा श्वास गुदमरून मृत्यू झाला. या प्रकरणी हणजूण पोलिसांनी कल्बचे मुख्य सरव्यवस्थापक राजीव मोडक (४९), गेट मॅनेजर प्रियांशू ठाकूर (३२), बार मॅनेजर राजवीर सिंघानिया (३२) आणि सरव्यवस्थापक विवेक सिंग (२७) यांना अटक केली आहे. तर मालक सौरभ लुथरा, गौरव लुथरा (रा. दिल्ली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत चार पर्यटक दिल्लीतील एकाच कुटुंबातील असून एक पर्यटक कर्नाटकातील आहे. अन्य २० जण क्लबमधील कर्मचारी असून यात उत्तराखंड (५), नेपाळ (४), झारखंड (४), आसाम (४), महाराष्ट्र (१), उत्तर प्रदेश (१), प. बंगालचे (१) रहिवासी आहेत. या सर्वांची ओळख पटली आहे.

दुर्घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र शोक व्यक्त केला. पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबीयांना दोन लाख रुपये आणि जखमींना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

घटनेप्रकरणी क्लबचे दोन मालक, व्यवस्थापक आणि कार्यक्रम आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून व्यवस्थापकासह तीन कर्मचाऱ्यांना अटक झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.