मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
अभिनेता सुशांत सिंह राजपूतची माजी मॅनेजर दिशा सालियनचे प्रकरण पुन्हा उठले आहे. सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशाच्या मृत्यूची नव्याने चौकशी करण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याची आणि तपास ‘सीबीआय’कडे सोपवण्याची विनंती करण्यात आली आहे. दिशावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप वडिलांनी केला आहे. यावर आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेली पाच वर्षे सातत्याने बदनामीचा प्रयत्न होत आहे. आपण कोर्टात पाहू, असे आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर आदित्य ठाकरे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, गेली पाच वर्षे सातत्याने बदमानीचा प्रयत्न होत आहे. हे प्रकरण कोर्टात आहे, कोर्टातच पाहू. आम्ही सरकारला एकाच अधिवेशनात उघडे पाडले आहे. फक्त आम्ही नाही, तर संघाने सुद्धा उघडे पाडले आहे. महिला अत्याचार, शेतकरी आत्महत्येवरून महाराष्ट्राची वाट बिकट होत आहे. हे सरकार निवडणूक आयोगामुळे निवडणूक जिंकले आहे. तरीदेखील सरकारचे 10 मुद्दे अधिवेशनात आले नाहीत. आम्ही सरकारला उघडे पाडले, एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. हे सगळे झाल्यावर आता माझ्यावरून सभागृह बंद पाडले जात आहे. तर, सभागृह बंद पाडुद्या. पण, तुम्ही सत्ताधारी पक्षातील आमदारांना महाराष्ट्राबद्दल बोलायला निवडून दिले आहे. तर महाराष्ट्राबद्दल बोला आणि चर्चा करा, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले आहे.