गिरणा नदीत पाय घसरून तरुणाचा बुडून मृत्यू

आजीच्या आधारावर जगणारा नातू काळाने हिरावला

0

एरंडोल | एरंडोल तालुक्यातील कढोली हद्दीतील कांताई धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या गिरणा नदीत पाय घसरून पडल्याने एका तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवार, दि. ८ रोजी सकाळी साडे अकरा ते पावणे बाराच्या दरम्यान घडली.
जळगाव येथील सिंधी कॉलनी परिसरातील चार तरुण कांताई धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. यावेळी ते गिरणा नदीत उतरून हातपाय धुत असताना दोन तरुणांचे पाय घसरून ते पाण्यात पडले. यावेळी तेथे मासेमारी करणारे व स्थानिक तरुणांनी तत्काळ धाव घेत एक तरुणाला वाचवले. मात्र आशुतोष दिलीपकुमार जोशी (वय २२, रा. सिंधी कॉलनी, जळगाव) हा पाण्यात बुडाल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आशुतोषला आई-वडील नसल्याने त्याचा सांभाळ त्याची आजी करत होती. मात्र काळाने त्यालाही हिरावल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आशुतोष बराच वेळ पाण्याबाहेर न आल्याने त्याच्या मित्राने त्याचे मामा गोविंद पुरुषोत्तम जोशी यांना फोन करून घटनास्थळी बोलावले. स्थानिक नागरिकांनी आशुतोषला पाण्याबाहेर काढून प्राथमिक उपचार केले. मात्र त्यानंतर त्याला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी मामा गोविंद जोशी यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात जबाब दिल्यानंतर आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी नरेंद्रसिंग पाटील करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.