वाळू तस्करीच्या वादातून खून, जुगार अड्ड्यांवर पूर्वीही रक्तरंजित घटना : अवैध धंद्यांना पोलिसांचे अभय की यंत्रणेचे दुर्लक्ष?
जळगाव – जिल्ह्यात अवैध धंद्यांचे जाळे दिवसेंदिवस विस्तारत असून त्याचे लोण जळगाव शहरापर्यंत येऊन पोहोचले आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अनेक ठिकाणी जुगार अड्डे बिनधास्तपणे सुरू असल्याची चर्चा असतानाच, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परिसरालगत असलेल्या एका कथित जुगार अड्ड्यावर सोमवारी रात्री गोळीबार झाल्याची चर्चा रंगली. या चर्चेमुळे परिसरात खळबळ उडाली असून शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
विशेष म्हणजे, दोनच दिवसांपूर्वी अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून एका व्यक्तीची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. यापूर्वीही काही वर्षांपूर्वी जुगार अड्ड्याच्या वादातून एकाचा खून झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे अवैध धंदे, आर्थिक व्यवहार आणि त्यातून निर्माण होणारे वाद यांचे रूपांतर गंभीर गुन्ह्यांत होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वीपर्यंत जळगाव शहर जुगार अड्ड्यांच्या बाबतीत तुलनेने अपवाद मानले जात होते. मात्र, आता शहराच्या आसपासच नव्हे तर शहरातही असे अड्डे सुरू झाल्याची चर्चा आहे. विद्यापीठ परिसरालगत गोळीबार झाल्याची चर्चा ही बाब अधिक गंभीर बनवणारी आहे.
जुगार अड्डे हे केवळ आर्थिक व्यवहारांचे ठिकाण राहत नाहीत, तर त्यातून लाखोंची उलाढाल, आर्थिक देवाणघेवाण, वाद, धमक्या आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढण्याचा धोका असतो. अशा ठिकाणी शस्त्रांचा वापर होण्यापर्यंत परिस्थिती पोहोचत असेल, तर ही बाब पोलीस प्रशासनासाठी निश्चितच चिंतेची आहे. प्रश्न असा आहे की, शहरात आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांची माहिती स्थानिक पोलीस यंत्रणेला नाही का? की माहिती असूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे? पोलीस प्रशासनाच्या देखरेखीशिवाय किंवा स्थानिक यंत्रणेच्या संभाव्य संगनमताशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरू राहणे शक्य आहे का, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे. अर्थात, याबाबत ठोस पुरावे आणि निष्पक्ष चौकशी आवश्यक आहे.
अवैध धंद्यांची यादी मोठी; कारवाई मात्र कुठे?
जिल्ह्यात अवैध वाळू वाहतूक, अवैध लाकूड वाहतूक, ड्रग्स व अंमली पदार्थांची विक्री, रेशनचा काळाबाजार, गुटखा विक्री, अवजड वाहनांची नियमबाह्य वाहतूक, सट्टा, पत्ता जुगार, कुंटणखाने आणि गोवंशाची अवैध वाहतूक अशा विविध प्रकारच्या अवैध व्यवसायांबाबत सातत्याने चर्चा होत असते. जिल्ह्यातील विविध भागांत हे प्रकार सुरू असल्याचे आरोप होत असताना त्यावर प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाई होताना दिसते का, हा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे. एखादी घटना घडली की काही दिवस कारवाईचा धडाका दाखवला जातो; मात्र त्यानंतर पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.
रोहिणी खडसे यांची प्रशासनावर टीका
राष्ट्रवादी (शप) गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे यांनीही प्रशासनाच्या कारभारावर सडकून टीका केली आहे. जिल्ह्यातील विविध प्रश्न आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरून त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे चर्चेत असतानाच अवैध धंद्यांचा वाढता प्रभाव हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. अवैध धंदे रोखणे ही केवळ एखाद्या पोलीस ठाण्याची जबाबदारी नसून संपूर्ण पोलीस यंत्रणेची सामूहिक जबाबदारी आहे. जुगार अड्ड्यांवर होणाऱ्या संभाव्य वादांचे रूपांतर खून आणि गोळीबारासारख्या गंभीर घटनांमध्ये होण्यापूर्वीच अशा अड्ड्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे.

