वाचन संस्कृतीचा अनोखा प्रवास!

0

वाचन संस्कृतीचा अनोखा प्रवास!

डॉ. पवन चांडक यांची परभणी-मुंबई ६०० किमी सायकल यात्रेचा समारोप

मुंबई प्रतिनिधी – वाचन संस्कृती घराघरात रुजावी, मुलांमध्ये पुस्तकांची ओढ वाढावी आणि समाजात सकारात्मक संदेश पोहोचावा या उद्देशाने होमिओपॅथिक अकॅडमी ऑफ रिसर्च अँड चॅरिटीज (HARC), परभणीचे अध्यक्ष डॉ. पवन चांडक यांनी परभणी ते मुंबई असा तब्बल ६०० किलोमीटरचा सायकल प्रवास चार दिवसांत पूर्ण करून एक वेगळाच आदर्श निर्माण केला. २९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या या वाचन जनजागृती यात्रेचा समारोप २ डिसेंबर रोजी मंत्रालयात झाला.

प्रवासादरम्यान त्यांनी आणि समन्वयक प्रकाश डूबे यांनी परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक व ठाणे जिल्ह्यांमधील अनेक जिल्हा परिषद शाळांना विशेष भेटी दिल्या. वाचनाची आवड जोपासण्यासाठी लोकसहभागातून निवडक दहा शाळांना ७५ पुस्तकांची ‘आनंदी वाचनपेटी’ भेट देण्यात आली.

केवळ वाचन नाही, तर मोबाईल व्यसनमुक्ती, सायकल वापर प्रोत्साहन, एड्स जनजागृती, “बेटी बचाओ–बेटी पढ़ाओ”, बालविवाह प्रतिबंध यांसह विविध सामाजिक विषयांवर मुलांशी व नागरिकांशी संवाद साधून जनजागृती करण्यात आली.

परभणीपासून मुंबईपर्यंतचा मार्ग:
परभणी ,जिंतूर ,मंठा ,वाटूर फाटा ,जालना ,बदनापूर , छत्रपती संभाजीनगर ,लासूर ,वैजापूर ,कोपरगाव , शिर्डी ,सिन्नर, घोटी, इगतपुरी, कसारा, भिवंडी ,ठाणे ,मुंबई.

मुंबईतील मंत्रालयात मराठी भाषा विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी डॉ. चांडक यांचा सत्कार करत त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. या वेळी भाषा संचालक अरुण गिते, उपसचिव नंदा राऊत आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. पवन चांडक आणि प्रकाश डूबे यांनी संपूर्ण प्रवासादरम्यान वाचनसंघ, सामाजिक संस्था, मंदिर, धर्मशाळा व वाचनप्रेमी नागरिकांकडून मिळालेल्या सहकार्याचे आभार मानत हा उपक्रम वाचन संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम ठरल्याची भावना व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.