आगामी निवडणुकांपूर्वीच जिल्ह्यातील महायुतीत फुट!

0

 

लोकशाही संपादकीय लेख 

येत्या 31 डिसेंबर नंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था शक्यतो महायुतीतर्फे लढविण्यात येतील. जेथे शक्य नाही तेथे भाजप स्वतंत्रपणे मैत्रीपूर्ण लढत लढेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले असले, तरी जळगाव जिल्ह्यात पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटातर्फे स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्णय आमदार किशोर पाटील यांनी आज स्पष्टपणे जाहीर केला.

गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत भाजप शिवसेना युती असताना भाजपतर्फे पाठीत खंजीर खुपसण्यात आला. भाजपचे अमोल शिंदे हे भाजपचे तालुकाध्यक्ष असताना अमोल शिंदे यांनी पाचोरा भडगाव मतदार संघात 2019 आणि 2024 च्या विधानसभा निवडणुकीत युती उमेदवारांविरुद्ध अपक्ष उमेदवारी लढवली. त्यातच अमोल शिंदेंना भाजपतर्फे छुप्या पद्धतीने आर्थिक मदतही केली. त्यामुळे पाचोरा भडगाव मतदार संघात दोनही वेळेस विधानसभा निवडणुकीत जो मनस्ताप भोगाव लागला, त्याची भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी साधी दखल देखील घेतली. नाही उलट निवडणुका संपल्यावर अथवा निवडणूक काळात अमोल शिंदेंवर कारवाई करायला हवी होती, ती केली गेली नाही. उलट निवडणुका संपल्यावर भाजपने त्यांना पदे दिली.

त्यामुळे युती या गोंडस नावाखाली अशाप्रकारे पाठीत खंजीर खुपसले जात असेल तर स्पष्टपणे पाचोरा भडगाव मतदार संघात युती ऐवजी शिंदे शिवसेनेतर्फे स्वबळावर निवडणुका लढवण्याचा मी निर्णय घेतला आहे असे आमदार किशोर पाटील यांनी स्पष्टपणे जाहीर केले. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात आताच महायुतीमध्ये फूट पडली, असे म्हटले तर त्यात वावगे काय? जळगाव जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या इतर आमदारांनी काय निर्णय घेतला, अथवा घेतील याची मला कल्पना नाही परंतु मी स्पष्टपणे जाहीर करतो की पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे शिवसेना स्वबळावर निवडणुका लढवणार आहे, अशी भूमिका किशोर पाटील यांनी घेतली. त्यामुळे आता हे स्पष्ट झाले आहे.

सध्या महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भाजपकडून जी वागणूक मिळते आहे, ती पाहता एकनाथ शिंदे यांनी आमदार किशोर पाटील यांना मूकसंमती दिली असल्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. वास्तविक पाहता 2019 आणि 2024 च्या निवडणुकीत युतीतर्फे आमदार किशोर पाटील यांना जी वागणूक मिळाली, ते पाहता किशोर पाटील यांनी घेतलेला निर्णय योग्यच आहे असे म्हणावे लागेल. त्यातच 2024 च्या विधानसभा निवडणुकीनंतर आमदार किशोर पाटलांचे मंत्रिमंडळाच्या पहिल्याच यादीत नाव होते. परंतु जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या आग्रहास्तव एकनाथ शिंदेंना आमदार किशोर पाटलांच्या ठिकाणी पालकमंत्री गुलाबराव पाटलांना पुन्हा संधी द्यावी लागली. त्यावेळी शिंदे शिवसेनेच्या आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता होती. ती अस्वस्थता पाहून अडीच वर्षानंतर विद्यमान मंत्र्यांना वगळून इतर आमदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल अशी तडजोड शिंदे यांनी केली आणि त्या आमदारांच्या अस्वस्थतेवर पडदा पाडला. तेव्हाच सर्वांना माहीत होती की अडीच वर्षानंतर काही खरे नाही.

आमदार किशोर पाटील यांना सुद्धा तसेच वाटते. म्हणून महायुती संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत स्वबळाचा दणका देणार, असा निर्णय घेतला. ही युती फुटण्याची नांदीच म्हणावी लागेल. कारण शिवसेनेत भाजप विषयी प्रचंड अस्वस्थता आहे. जळगाव जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे पालकमंत्री असले, तरी इतर शिवसेना आमदारांमध्ये त्यांचे बाबत कमालीची नाराजी दिसून येते. जळगाव महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाची सत्ता आणण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची काही अंशी भिस्त माजी महापौर ललित कोल्ह्यांवर होती. तथापि ललित कोल्हे हे बनावट कॉल सेंटर प्रकरणी अटकेत असल्याने ललित कोल्ह्यांना महापालिका निवडणुकीची जबाबदारी मिळणे शक्य नाही. उलट ललित कोल्हे हे गुलाबराव पाटील तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अत्यंत निकटचे असल्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील अडचणीत आले आहेत. एवढे नेते पाठीशी असताना ललित कोल्हे यांच्या फार्म हाऊस वरील बनावट कॉल सेंटरवर धाड पडायला नको होती. परंतु गृहमंत्रालयाकडून ही धाड पडली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये महायुतीत आत्ताच फाटाफुट होत असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण होणार आहे..!

Leave A Reply

Your email address will not be published.