नवऱ्याला जामीन देण्याचा बहाणा : विवाहितेवर अत्याचार
शेतावर नेत सामूहिक अत्याचार : दोघांना अटक एक फरार
लोकशाही न्यूज नेटवर्क
नाशिकमधून धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. नाशिकच्या पंचवटी परिसरात एका वीस वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. पीडित महिलेवर अत्याचार करणारा आरोपी तिचा नातेवाईक असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचा पती तुरुंगात शिक्षा भोगत आहे. आरोपींनी तिच्या पतीला जामीन देऊन सोडवण्याचे आमिष दाखवले. पीडितेला शेतावर नेले आणि तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. आरोपींनी मिळून तिला मारहाण देखील केली. त्यानंतर पीडितेने पोलीस ठाण्यात अत्याचार आणि मारहाण झाल्याची तक्रार केली.
अत्याचार करणारी व्यक्ती ही पीडित महिलेचा नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्या आरोपीनेच पीडितेला आमिष दाखवत शेतामध्ये नेले होते. दरम्यान या प्रकाराची माहिती मिळताच पंचवटी पोलिसांनी तपास करायला सुरुवात केली. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. गुन्ह्याअंतर्गत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर फरार असलेल्या एका आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत.
‘मोकळ्या शेतात नेऊन मारहाण केली आणि अत्याचार केला अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे. आरोपींपैकी एकजण तिचा नातेवाईक आहे. पीडितेचा नवरा नाशिक सेंट्रल तुरुंगात आहे. नवऱ्याला जामीन मिळवून देऊ असे आमिष दाखवून पीडितेला मुंबईतून बोलवून तिच्यावर आरोपींनी अत्याचार केला’, अशी माहिती पंचवटी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली आहे.