जळगावात ‘गुलेन बारे सिंड्रोम’चा रुग्ण आढळला!
वैद्यकीय महाविद्यालयात महिलेवर उपचार : नागरिकांनी काळजी घ्यावी
जळगाव : राज्यभरात गुलेन बारे सिंड्रोम अर्थात जीबीएस आजाराचा पहिला रुग्ण जळगाव तालुक्यात आढळून आला आहे. विशेष म्हणजे कुठलीही ‘ट्रॅव्हल्स हिस्ट्री’ नसताना एका 45 वर्षीय महिलेला हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात वैद्यकीय पथकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत.
जळगाव तालुक्यातील एका भागात रहिवासी असलेली 45 वर्षीय महिलेला अशक्तपणा, अंगदुखी, खांदे दुखणे, पाठ दुखणे, अचानक चालण्यास-बसण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवली. कुटुंबीयांनी गुरुवार दि. 30 रोजी संध्याकाळी 5 वाजता या महिलेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केल्यानंतर महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.
सदर महिला कुठल्याही गावाला गेली नव्हती. त्यामुळे तिला ट्रॅव्हल्स हिस्ट्री नाही. तसेच, राहत्या घरीच अशक्तपणाची लक्षणे जाणवायला लागली होती. त्यामुळे कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात आणल्यामुळे सध्या महिलेची प्रकृती स्थिर आहे. न्यूरॉलॉजिस्ट डॉ. गोपाल घोलप, डॉ. अभिजित पिल्लई यांच्या देखरेखीखाली रुग्णावर उपचार सुरु आहेत. आजारातील बहुतांश रुग्ण बरे होतात. राज्यात एकदम कमी रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता पडत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. पाणी उकळून पिणे, स्वत:ची रोगप्रतिकारक्षमता वाढविणे तसेच स्वच्छ पाण्याचा आग्रह धरणे या उपाययोजना महत्त्वाच्या आहेत.
जिल्हा प्रशासन सज्ज; तयारीसाठी घेतली कार्यशाळा
गिलियन बॅरे सिंड्रोम तसेच अन्य आरोग्य संकटांवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील उपस्थित होते.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, जीबीएसवर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणांनी ठोस कृती आराखडा तयार करून, उपलब्ध साधनांचा प्रभावी वापर करावा. मनुष्यबळाची कमतरता असली तरी नियोजनबद्ध काम केल्यास आरोग्याशी संबंधित संकटांवर यशस्वीरित्या मात करता येईल. जिल्ह्यात औषधसाठा पुरेसा असल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच ग्राम पातळीवर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण व तपासणी नियमित करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संशयित रुग्ण आढळल्यास त्वरित संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही देण्यात आले.
ही आहेत सर्वसाधारण लक्षणे
अचानक पायातील किंवा हातात येणारी कमजोरी, लकवा, अचानकपणे उद्भवलेला चालण्यातील त्रास किंवा कमजोरी, डायरिया असे लक्षणे दिसून येतात. पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी उकळून घेणे, अन्न स्वच्छ आणि ताजे असावे, वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यात यावा, शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित न ठेवल्यासही संसर्ग टाळता येईल.