लोकशाही संपादकीय लेख
एमपीएससी परीक्षेतील सावळा गोंधळासंदर्भात महाराष्ट्र, पुणे, नाशिक, सोलापूर, नागपूर आणि जळगाव येथे भव्य मोर्चे शांततामय मार्गाने निघाले. एमपीएससी परीक्षेत पारदर्शकपणा जपला पाहिजे, पेपरफुटी प्रकरणी अध्यक्षांना दोषी धरून त्यांच्यावर राजीनाम्याची कारवाई करण्यात यावी, औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणी दुबार पेपर घेण्यात यावा, या व अशा अनेक मागण्या विद्यार्थ्यांनी निषेध मोर्चाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन व्यक्त केल्या होत्या. सर्व मोर्चे अत्यंत शांतपणे आणि लोकशाही मार्गाने पार पडले. याबाबत जादा ताण-तणाव न घेता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांनी कबूल केले की, एमपीएससी परीक्षेत घोटाळा झाला आहे. परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त आहेत. त्यामुळे या परीक्षेतील घोटाळ्यासंदर्भात एसआयटी नेमून त्यामार्फत पूर्वचौकशी केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिली.
संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर आता २५ ऑक्टोबरऐवजी ३ जानेवारी २०१७ म्हणजे पुढील वर्षाच्या सुरुवातीच्या काळात घेतला जाणार आहे, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे पुढचा जो काही अनर्थ होणार होता, तो टळला आहे. विद्यार्थ्यांमध्ये या एमपीएससी परीक्षेबाबत भयानक असा संताप होता. तो संताप मोर्चाच्या माध्यमातून पदोपदी जाणवत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भावना ओळखून मुख्यमंत्र्यांनी कसलाही वेळ न दवडता त्यांच्याशी संवाद साधला. त्यामुळे पुढचा देखील अनर्थ टळला. अन्यथा विद्यार्थ्यांनी जंतर-मंतरवर दुसरे आंदोलन केले जाईल आणि ते शासनाला महागात पडेल, असा इशारा दिला होता. केंद्र शासनानेसुद्धा त्याचा सारासार विचार करून विद्यार्थी जंतर-मंतरवर पोहोचण्याआधी त्यावर योग्य तोडगा काढला. यातच धाराशिव जिल्ह्यातील परंडा येथील एक विद्यार्थी प्रथमेश देशमुख याने या सर्व परीक्षा पद्धतीला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. घरून दोन ते अडीच लाख रुपयांचे कर्ज काढून तो एमपीएससीचा अभ्यास करण्यासाठी परंड्याहून पुणे येथे आला होता. एमपीएससी परीक्षा पास होण्याचे तो स्वप्न पाहत होता; पण परीक्षेतील सावळ्या गोंधळामुळे त्याच्या स्वप्नांचा चुराडा झाला. पेपरफुटी प्रकरणी तो निराश व हताश झाला आणि अडीच लाख रुपयांचे कर्जाचे ओझे आपल्या आई-वडिलांच्या डोक्यावर बसले आहे, याचा प्रथमेश देशमुख याला मनस्वी त्रास झाला. त्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केली.
प्रथमेश देशमुख या विद्यार्थ्याची आत्महत्या सर्व विद्यार्थ्यांना त्रास देऊन गेली आणि पुन्हा संतापाची लाट त्यांच्यात उसळली. प्रथमेशच्या आई-वडिलांना काय वाटले असेल? आपला मुलगा कर्ज काढून पुण्याला गेला, तेथे एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करता करता परीक्षेत सावळा गोंधळ झाला आणि त्याला कंटाळून त्याने आपली जीवनयात्रा संपवली. जो मुलगा परीक्षेचे स्वप्न पाहत होता, त्याने आपली जीवनयात्रा संपवली. त्या आई-वडिलांनी कोणत्या परिस्थितीत स्वतःला सांभाळले असेल, याची कल्पनाच केलेली बरी. प्रथमेश देशमुखच्या आत्महत्येला जबाबदार कोण, याचे उत्तर देणार कोण? प्रथमेशची आत्महत्या नसून परीक्षा पद्धतीने त्याचा घेतलेला बळीच होय, अशा प्रकारचा संताप विद्यार्थी व्यक्त करत आहेत. काही का असेना, अखेर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश आले. त्यांच्या जवळजवळ सर्व मागण्या मान्य झाल्या, ही बाब तितकीच महत्त्वाची आहे. आता जेन-झीसमोर कोणाचे काही चालत नाही. त्यांनी आवाज उठवला की किती पूर्वदिशा म्हणता येईल.
याआधी कॉक्रो जनता पार्टीच्या वतीने एक महिना दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन केले. त्याला केंद्र शासनाने हलक्यात घेतले. कारण काय, तर किती दिवस ते तग धरतील? काही दिवसांत त्यांची माघार होईल, या भ्रमात केंद्र शासन होते. पण झाले उलटे. २० जुलै रोजी संसदेवर जो मोर्चा निघाला, त्या मोर्चाचे स्वरूप कमालीचे होते. त्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला, पॅलेट गनचा वापर केला. निरपराध तरुणांवर लाठ्या चालविण्यात आल्या. पण तरुण काही केल्या नमले नाहीत. ते माघारी हटले नाहीत. अखेर तरुण अराजक माजवत असल्याचा आरोप करणारे शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. तरुणांचा विजय झाला. त्यानंतर कॉक्रो जनता पार्टीचे स्कूल टिक करून आंदोलन सुरू झाले. त्यातही भयानक सत्य घटना बाहेर येत आहेत. म्हणून एमपीएससी या परीक्षेसंदर्भात विद्यार्थ्यांशी तातडीचा संवाद साधून त्यातून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्याबद्दल त्यांचे देखील अभिनंदन केले पाहिजे. अजून मुंबईत वगैरे मोर्चे निघण्याच्या आधी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून योग्य तो मार्ग काढला, हे फार बरे झाले. प्रकरण चिघळण्याच्या आधी त्यांच्या भावना ओळखून मुख्यमंत्र्यांनी योग्य तो तोडगा काढला, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन.

