क्रूरतेचा कळस : बलात्कार करून दगडाने ठेचला चेहरा
विरवाडे शिवारात १४ वर्षीय मुलीवर बलात्कार : ऐन गणेशोत्सवाच्या दिनी उघडकीस आली घटना
मिलिंद सोनवणे
चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
संपूर्ण भारतात महिला अत्याचाराच्या घटना दररोज घडत आहेत. त्यात चोपडा तालुक्यात ही सतत महिलांवर अत्याचार बलात्काराच्या घटना घडत आहेत. विरवाडे शिवारात एका १४ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना गणेशोत्सवाच्या दिनी उघडकीस आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि ७ रोजी सायंकाळी ४ ते ५ वाजेच्या सुमारास अल्पवयीन चार चिमुकल्या बहिणी स्वतःच्या शेतातून काम करून घरी येत असताना त्यातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयीत आरोपी मुकेश पुण्या बारेला याने वाघ्या नाल्याकडे पकडून नेले. दरम्यान अन्य तिघी बहिणींनी घाबरून घराकडे धाव घेत गावातील लोकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर गावातील ४० ते ५० लोक तिचा शोध घेत असताना सदरील मुलीचा मृतदेह विवस्त्र व चेहरा चेंदामेंदा करून विचित्र अवस्थेत विरवाडे शेत शिवारात भगवान गोटु पाटील यांच्या कपाशीच्या शेतात आढळून आला.
दरम्यान ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली व पोलीस सुत्रांना माहिती मिळताच पोलीस अधिकारी फौज फाट्या सह घटनास्थळी दाखल झाले. काही तासातच संशयित आरोपी यास अटक करण्यात आली. दुसऱ्या दिवशी सकाळी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनास्थळी पोलीस अधिक्षक महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस उपअधीक्षक कविता नेरकर, पोलीस उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे, स्थानिक गुन्हा अन्वेषण चे बबन आव्हाड, पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पीएसआय एकनाथ भिसे, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वालटे, यांनी भेट देऊन हामा सुमला बारेला यांच्या फिर्याद वरून गुन्हा दाखल केला.
आरोपी मुकेश पुण्या बारेला यांच्याविरोधात भाग ५ सीसीटीएनस ४५४/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ६५, ६६, १०३ पोस्को ४ /८१२ प्रमाणे गुन्हा नोंदण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर करीत आहेत.