लोकशाही न्यूज नेटवर्क
कल्याणमध्ये एका अल्पवयीन मुलाचा निष्काळजीपणा एका नामांकित व्यावसायिकाच्या जीवावर बेतला आहे. भरधाव कारने सायकलिंग करणाऱ्या व्यावसायिकाला जोरदार धडक दिली. त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हा भीषण अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
अल्पवयीन मुलाने घरातून कारची चावी घेऊन कार रिंग रोडवर नेली. स्टिअरिंगवरून ताबा सुटल्याने त्याने रस्त्यावर सायकलिंग करणाऱ्या व्यक्तीला धडक दिली. या धडकेत कल्याणमधील नामांकित व्यावसायिक श्रीनिवास तांदळे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणात खडकपाडा पोलिसांनी कार जप्त केली आहे.
या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन चालकासह त्याच्या आईविरोधातही गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर मुलाच्या आईची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर उपचार सुरू असून, प्रकृती स्थिर झाल्यानंतर तिला अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, गांधारी रिंग रोड हा अपघातांचा ‘हॉटस्पॉट’ बनत चालल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन, निष्काळजीपणे वाहन चालवणे आणि अपुरी वाहतूक नियंत्रण व्यवस्था यामुळे अशा घटनांत वाढ होत असल्याची चर्चा आहे.
या प्रकरणात अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून त्याला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या हातात वाहन न देण्याचे आवाहन वाघमोडे यांनी जनतेला केले आहे.
कल्याणमधील गांधारी जवळून जाणारा रिंग रोड आता भरधाव कारचालकांमुळे अपघातांचा हॉटस्पॉट ठरला आहे. या रिंग रोडवर सुरू असलेले मुजोर वाहनचालकांचे स्टंट आता मॉर्निंग वॉक आणि सायकलिंग करणाऱ्या नागरिकांच्या जीवावर बेतू लागले आहेत. मंगळवारी रात्री श्रीनिवास तांदळे हे व्यावसायिक रिंग रोडवर सायकलिंग करत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारने त्यांना धडक दिली. या धडकेत श्रीनिवास तांदळे यांचा मृत्यू झाला. अपघाताचा हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. धक्कादायक म्हणजे ही कार एक अल्पवयीन मुलगा चालवत होता. रात्री खडकपाडा पोलिसांनी कार जप्त केली होती, तर मुलगा पळून गेला होता. बुधवारी सकाळी नऊच्या सुमारास १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला खडकपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

