
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
पवार कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हते, अशी टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली होती. यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सदाभाऊ खोत यांना चांगलेच सुनावले आहे. पुरोगामी विचार तुम्हाला झेपण्यापलिकडचे आहेत, त्यामुळे फार बाता मारून नका, असा इशाराच त्यांनी खोत यांना दिला आहे.
रोहिणी खडसे यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून ही प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की, सदाभाऊ, तुम्ही ज्या पवार कुटुंबीयांवर बोलताय त्या कुटुंबाचा भाग आदरणीय अजितदादा पण आहेत, ज्यांचा प्रचार तुम्ही आणि तुमचे सवंगडी करत आहेत त्या आदरणीय सुनेत्रा वहिनी सुद्धा त्याच कुटुंबाचा भाग आहे. रोहिणी खडसे पुढे म्हणाल्या की, कसंय ना, माणसाने झेपेल तितकंच बोलायला हवे! तुमचा आणि पुरोगामी विचारांचा संबंध येतो का? शरद पवारांच्या मातोश्री ब्रिटिश राजवटीत पुणे लोकल बोर्डाच्या सदस्य होत्या. शरद पवारांचे वडील हे सत्यशोधक चळवळीत काम करायचे तसेच शिक्षणाची गंगा बहुजनांच्या प्रत्येक घरात पोहोचावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यात शरद पवारांच्या वडिलांनी त्यांना मोलाची साथ दिली. इतकंच काय जिथं प्रतिगामी लोक वंशाचा दिवा पाहिजे म्हणून मुलगा व्हावा याचा अट्टाहास करतात, तिथे पवार साहेबांनी मुलीच्या जन्माचे स्वागत केले, असे म्हणत त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधला.
बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले आहे. यावरून बोलताना सदाभाऊ खोत यांनी पवार कुटुंबावर टीका केली. शरद पवार यांचे कुटुंब हे कधीच पुरोगामी नव्हते. पुरोगामी पणाच्या आडोशाने सत्तागामी हाच एक कलमी कार्यक्रम पवारांनी व त्यांच्या कुटुंबाने महाराष्ट्रात राबवला आहे. राज्यात शाहू, फुले आणि आंबेडकरांचे नाव घेऊन मतांचा पुरोगामी जोगवा मागायचा. सत्तेच्या खुर्चीवर आरूढ होतात, मला पुरोगाम्यांना विचारायचं आहे ते आता आंधळे, बहिरे झाले आहेत का ? असा सवाल उपस्थित करत त्यांनी पवारांवर हल्लाबोल केला होता.

