लोकशाही संपादकीय लेख

महाराष्ट्रात पोलीस प्रशासनाच्या वतीने मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. एकूण नऊ अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची पुणे येथे गुन्हे शाखेच्या अधीक्षकपदी बदली करण्यात आली आहे. तर जळगावच्या पोलीस अधीक्षकपदी धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची बदली झाली आहे. श्रीकांत देवरे यांनी आज सूत्रे स्वीकारली. एक डॅशिंग पोलीस अधीक्षक म्हणून श्रीकांत धिवरे यांची ख्याती आहे. डॅशिंग पोलीस अधीक्षकांची जळगाव जिल्ह्याला गरज होतीच. कारण जळगाव जिल्ह्याच्या कायदा व सुव्यवस्थेमध्ये सुधारण्यासाठी अशा पोलीस अधिकाऱ्यांची आवश्यकता होती. सर्वप्रथम तर जळगाव जिल्ह्याच्या पोलीस दलात अंतर्गत प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. शनिपेठ पोलीस स्टेशनचे एक उदाहरण द्यायचे झाले तर महिनाभरापूर्वी या पोलीस स्टेशन मध्ये दोन राजकीय गटात फ्री स्टाईल हाणामारी झाली होती. त्या फ्री स्टाईल हाणामारीला आवरण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना लाठीचार्ज करावा लागला होता. हे सगळे प्रकरण निस्तरण्याआधीच शनिपेठ पोलीस स्टेशन मधील नाईक विनोद अहिरे एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पकडला गेला. या प्रकरणात विनोद अहिरे यांना तातडीने बडतर्फ करण्यात आले तर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज कावेरी कमलाकर यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. नियंत्रण कक्षात बदली म्हणजे त्यांना एक प्रकारची सजा समजली जाते. पण अशा बदलीने प्रश्न सुटणार नाही. त्यांची मानसिकता ही सेवे ऐवजी मेवा खाण्यावर असते, त्यांच्यात काही बदल होणार नाही असे आमचे मत आहे. दुसरे सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस निरीक्षक आणि आमदार एकनाथ खडसे यांच्यात जो वाद निर्माण झाला तो पोलीस स्टेशनचे इन्चार्ज म्हणून अशोभनीय आहे. गौण खनिज संदर्भात तक्रार घेऊन गेलेल्या खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची हिम्मत तिथल्या पोलीस निरीक्षकाचे वर्तन हे कोणाच्यातरी सूचनेनुसार केले जात जाते, हे योग्य नाही. त्याआधी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रग पुरवठ्या संदर्भात आरोपींचे पोलीस अधिकारी यांचे असलेले संबंध चव्हाट्यावर आले. आमदार चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा त्या पोलीस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. त्यांना बडतर्फ करावे अशी अशी मागणी आमदार चंद्रकांत पाटील यांची होती. बडतर्फ करा अशी मागणी करून करून आमदार चंद्रकांत पाटील थकले पण बदलीने त्यांची बोळवण करण्यात आली. दुसरे चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत दोन पोलिसांमध्ये ड्युटी वरून वाद निर्माण होऊन दोघांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. त्यात एकाचे फ्रॅक्चर झाले. कारण काय? तर महत्त्वाच्या ठिकाणी ड्युटी लागण्यावरून या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. असे अनेक प्रश्न जिल्ह्याच्या पोलीस स्टेशन अंतर्गत होतात. त्यांची काय दखल घेतली जाते? तर त्यांची बदली करण्यात येते. बदली हा त्यावरचा उपाय आहे काय? हा खरा प्रश्न आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून कडक पावले उचलली गेली पाहिजे. ती उचलली गेली नाहीत म्हणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न प्रश्न गंभीर बनला आहे.
दुसरा प्रकार म्हणजे जळगाव जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालणे हे होय. दोन तीन महिन्यापासून एका मागास वर्गीय तरुणाची इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकली म्हणून पाच सहा जणांनी मारहाण करत हत्या केली. त्या हत्या प्रकरणात चार-पाच आरोपींना अटक करण्यात आली, पण मुख्य आरोपी राहुल सोनवणे याला अद्याप अटक झालेली नाही. ती अटक का होत नाही? ‘राहुल सोनवणे सापडत नाही’ असे पोलिसांचे म्हणणे आहे. पण ते न पटणारे आहे. तो एक मोठा कंत्राटदार आहे आणि तो सापडत नाही? हे पोलिसांचे म्हणणे काही पटत नाही. त्याला कोणत्या पुढार्याचा आशीर्वाद आहे, पोलिसांना माहित आहे. त्याला पकडणे हे पोलिसांसमोर आव्हान आहे. जिल्ह्यात गेल्यावर्षी वर्षभरात जे खून झाले त्याला पोलीस यंत्रणाच जबाबदार आहे. हे खून अगदी बंदुकीचे वार करून करण्यात आले आहेत. साध्या भांडणात देखील बंदुकीच्या फैरी झाडल्या जात आहेत. याला काय म्हणावे? या अनधिकृत बंदुकी येतात कोठून? त्या कशा काय वापरल्या जातात? याचे नियंत्रण असणे गरजेचे आहे. पण ते पोलिसांकडून होत नाही. खुनाचे वाढते प्रकरण थांबले पाहिजे, ही रास्त मागणी मान्य झाली पाहिजे विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांकडून प्रचार फेरीत बंदुकीच्या फेरी झाडण्याचा प्रकार मुक्ताईनगर मतदारसंघात झाला. त्यात आरोपी मोकाट सुटतात.. त्याला काही आवर घालणार आहेत की नाही? गौण खनिजाची वाढती चोरी हे एक गौण खनिज माफीयांचा प्रकार आहे. या गौण खनिज माफीयांना आवर घालणे आवश्यक आहे. ते होत नाही. वाळूमाफिया सर्रास वाळूची तत्कारी करत आहेत. अवैध पैशाच्या जोरावर त्यांची मजल असे कृत्य करण्यापर्यंत जाते. त्या वाळूमाफियांवर आवर घालणे आवश्यक आहे. नवे अधीक्षक हे आव्हान स्वीकारतील का? हा खरा प्रश्न आहे. मटका जुगार हा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर चालतो. त्या मटका जुगार अड्ड्यांवर नियंत्रण आणणे किंवा मटका पूर्णपणे बंद करणे आवश्यक असताना तो बंद केला जात नाही. यामागील कारण काय? अवैध दारू अड्डे सर्रास चालू आहेत. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेला धोका निर्माण होतो. ते अवैध दारू अड्डे बंद व्हावेत अशी मागणी आहे. एकंदरीत कायदा व सुव्यवस्था बिघडण्याची कारणे जळगाव जिल्ह्यात वाढली आहेत. ही एक प्रकारची जिल्ह्याला लागलेली कीड आहे. ती बंद झाली पाहिजे. नवीन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी हे आव्हान स्वीकारून ते नियंत्रणात आणावे अशी मागणी होत आहे..!


