जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

मराठी रंगभूमीच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेल्या ‘ऑल द बेस्ट’ या अजरामर विनोदी नाटकाचा प्रयोग मंगळवार, ७ जुलै रोजी रात्री ८ वाजता जळगाव येथील छत्रपती संभाजीराजे नाट्यसंकुलात सादर होणार आहे. या प्रयोगाची रंगप्रेमींमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, रसिकांना पुन्हा एकदा निखळ हास्य आणि भावनिक अनुभवाची पर्वणी मिळणार आहे.

‘ऑल द बेस्ट’ हे नाटक केवळ विनोदी नसून मैत्री, प्रेम, संघर्ष आणि मानवी नात्यांचे विविध पैलू प्रभावीपणे उलगडणारे आहे. हसवता-हसवता डोळ्यांत पाणी आणणारे हे नाटक अनेक वर्षांपासून मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. या नाटकातील चपखल संवाद, प्रभावी अभिनय, कलाकारांमधील उत्कृष्ट टायमिंग आणि कथानकाची सहजता ही त्याची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. काळ बदलला तरी मैत्री आणि माणुसकीचा संदेश आजही तितकाच समर्पक वाटत असल्याने हे नाटक पिढ्यानपिढ्या लोकप्रिय ठरले आहे.
व्हिडिओ पहा
https://www.instagram.com/reel/DaH0x3BgB1w/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA=
नाटकातून कठीण प्रसंगात एकमेकांची साथ आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला, तर कोणत्याही संकटावर मात करता येते, असा आशय प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. त्यामुळे हे नाटक केवळ मनोरंजन न करता जीवनाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची प्रेरणाही देते. या अविस्मरणीय नाट्यप्रयोगाचा आनंद घेण्यासाठी जळगावसह परिसरातील नाट्यप्रेमींनी कुटुंबीय व मित्र-परिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


