
जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
कष्टकरी पत्नी, मेहनत करणारी मुले पण व्यसनाच्या आहारी गेलेला कुटुंबप्रमुख असे चित्र केसी पार्क परिसरातील पाटील कुटुंबाचे होते. मात्र, याच व्यसनाने घरादारावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ आणली आणि सततच्या छळाला कंटाळून पत्नीने जन्मभरासाठी पतीलाच संपवले. एका व्यसनापायी हसतेखेळते कुटुंब कसे उद्ध्वस्त होते, याचे हे विदारक उदाहरण समोर आले आहे.
शहरातील केसी पार्क परिसरातील रहिवासी भरत नामदेव पाटील यांच्या दारूच्या व्यसनाने संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य टांगणीला लावले होते. मेहनतीने कमावलेले पैसे दारूवर उडवल्यानंतर त्यांनी राहते घरही विकून टाकले होते. डोक्यावरचे छप्पर गेल्यामुळे आणि पतीच्या सततच्या त्रासामुळे पत्नी मनीषा पाटील कमालीच्या तणावाखाली होत्या. याच नैराश्यातून मंगळवारी रात्री वादाचे रूपांतर एका भीषण हत्याकांडात झाले.
सुरुवातीला हा प्रकार पलंगावरून पडून झालेला अपघात असल्याचा भासवण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी जेव्हा मृतदेहाचे बारकाईने निरीक्षण केले, तेव्हा त्यांच्या मानेवर संशयास्पद खुणा आढळल्या. वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनाच्या प्राथमिक अहवालात गळा आवळल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखवला, तेव्हा पत्नीने गुन्ह्याची कबुली दिली, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मनीषा पाटील या कापड दुकानात काम करून घर चालवत होत्या, तर त्यांची मुलेही एमआयडीसीमध्ये कामाला जाऊन हातभार लावत होती. मात्र, पतीच्या व्यसनामुळे घरात दररोज शांततेऐवजी भांडणे होत होती. दि. 5 मे रोजी रात्री कामावरून थकल्या-भागल्या घरी परतलेल्या मनीषा यांना पतीने पुन्हा वादात ओढले आणि याच क्षणी संयम सुटल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. संतापाच्या भरात पत्नीने दोरीचा वापर करून पतीचा गळा आवळला. झटापटीत भरत पाटील खाली कोसळले आणि त्यांच्या नाका-तोंडातून रक्तस्त्राव झाला. स्थानिक तरुणांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात नेले खरे, पण तोपर्यंत उशीर झाला होता. पोलिसांनी आता याप्रकरणी खुनाचा गुन्हा नोंदवून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.

