नैसर्गिक रंगांची साथ निरोगी उद्याची वाट!

0

 

लोकशाही संपादकीय लेख

भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. विविधतेत एकता जपणाऱ्या आपल्या संस्कृतीत प्रत्येक सणाला विशेष असे महत्त्व आहे. त्यापैकी होळी आणि रंगपंचमी हा आनंद व उत्साहाचा आणि बंधुभाव वाढवणारा सण मानला जातो. वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवणारी होळी त्यानंतर रंगांच्या उधळणीने साजरी केली जाते. रंगपंचमी ही पारंपारिक अनेक शतकापासून चालत आलेली परंपरा आहे. परंतु बदलत्या काळानुसार या सणाला सणाच्या स्वरूपात मोठा बदल झालेला आहे. आनंदाच्या या उत्साहावर कृत्रिम आणि घातक अशा रंगांची काळी छाया पडताना दिसते. त्यामुळे पर्यावरण पूरक होळी साजरी करणे ही काळाची गरज बनत चालली आहे.

पूर्वी रंगपंचमी हा नैसर्गिक रंगांनी साजरा केला जात असे. फुलापासून तसेच हळद, चंदन, पालक, बीट यांसारख्या वनस्पतींपासून रंग तयार केले जात. हे रंग त्वचेला सुरक्षित व पर्यावरणाला हितकारक आणि आरोग्यास देखील पोषक असे होते. परंतु आज बाजारात उपलब्ध असलेले बहुतेक रंग हे रासायनिक प्रक्रियेतून तयार केलेले असतात. त्यात शिसे, पारा, क्रोमियम, तांबे यांसारख्या धातूंचा संचय आढळून येतो. हे रंग स्वस्त असले तरी त्याचे दुष्परिणाम हे अत्यंत गंभीर असतात. घातक रंगांचा वापर केल्यामुळे त्वचारोग, डोळ्याचे विकार, श्वसनाचे त्रास, एलर्जी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. लहान मुले आणि जेष्ठ नागरिक यांना त्याचा अधिक धोका असतो. रंगांमध्ये मिसळलेल्या रसायन त्वचेतून शरीरात शोषले जाऊन दीर्घकालीन आजाराला कारणीभूत ठरू शकतात. काही वेळा केस गळणे, त्वचेवर पुरळ येणे, डोळ्यांना जळजळ होणे अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. सणांचा आनंद घेण्यासाठी केलेली रंगांची उधळण आरोग्याला बाधा आणणारी ठरते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. केवळ मानवी आरोग्यास नव्हे तर पर्यावरणावर देखील या रासायनिक रंगांचा विपरीत परिणाम होतो. रंग खेळल्यामुळे हे रसायन युक्त पाणी नाल्यांमधून नद्यांमध्ये आणि जमिनीत मिसळते. त्यामुळे प्रदूषण वाढते. जलचर प्राणी, वनस्पती यांना त्याचा धोका निर्माण होतो.

आधीच वाढत्या औद्योगीकरणामुळे आणि प्रदूषणामुळे पर्यावरण संकटात सापडले आहे असल्याने सणांच्या निमित्ताने आपण आणखी प्रदूषण वाढविणे योग्य ठरेल का? हा विचार प्रत्येकाने करणे आवश्यक आहे. आज समाज माध्यमे आणि जाहिरातींमुळे रंगपंचमीचा उत्साह अधिक आक्रमक आणि दिखाऊ स्वरूपात साजरा केला जात आहे. डीजे, पाण्याच्या तोफा, मोठ्या प्रमाणावर रंगांची उधळण, रासायनिक फोम याचा वापर वाढला आहे. अनेक ठिकाणी पाण्याचा प्रचंड वापर व अपव्य होतो. पाण्याची टंचाई भासत असलेल्या राज्यात आपणच केलेला पाण्याचा अपव्य ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे सण साजरा करताना सामाजिक जबाबदारीचे भान राखणे आवश्यक आहे.

पर्यावरण पूरक रंगपंचमी म्हणजे आनंदावर बंधन नाही तर आनंदाला सजगतीची जोड हवी. अलीकडे रंग खेळताना इतका हिडीस प्रकार होतो की, त्याला तोड नाही. दारू पिऊन झिंगणार्‍यांची संख्या अलीकडे वाढलेली आहे. दारूच्या नशेत आपण किती रंग खेळतो आहे, याचे भान त्यांना राहत नाही. अंगावर रंग टाकले जातात परंतु पिंपचे पिंप पाणी देखील ओतले जाते. गटारीचे पाणी देखील अंगावर फेकण्याची मजल या दारुड्यांकडून होते. हा प्रकार बंद झाला पाहिजे. दारू शिवाय रंग खेळण्यात येत नाही असे त्यांना वाटते. त्यामुळे होळी सणावर दारुडे लोक कब्जा करतात आणि एखाद्याला टार्गेट करतात. म्हणजे कॉलेजमध्ये रॅगिंगचा प्रकार असतो तसा प्रकार येथे पाहायला मिळतो. शासनाने या गंभीर बाबींवर ठोस पावले उचलण्याची गरज आहे. घातक रसायनुक्त रंगाच्या विक्रीवर बंधन आणले पाहिजे. जनजागृती मोहीम राबविणे, शाळा कॉलेजेस मधून विद्यार्थ्यांना पर्यावरण पूरक सण साजरे करण्याचे शिक्षण देणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांना सुरक्षित रंग वापरण्याची सवय लावली पाहिजे. माध्यमांनीही आकर्षक पण सुरक्षित रंग पंचमीचा संदेश समाजाला पोहोचावायला हवा.

रंगपंचमी हा केवळ रंगांचा सण नसून तो आपुलकीचा, मैत्रीचा, सामाजिक एकोप्याचा उत्सव आहे. रंगांच्या अतिरेकाने आणि रासायनिक दुष्परिणामांमुळे सणाचा मूळ उद्देश हरवत चालला आहे. आनंद साजरा करताना इतरांच्या आरोग्याची, पर्यावरणाची आणि भविष्यातील पिढ्यांची जबाबदारी विसरून चालणार नाही. सण साजरा करू या…. पण सजगतेने.. ही भूमिका प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे. अखेरीस रंगपंचमी साजरी करताना प्रत्येकाने स्वतःला एक प्रश्न विचारला हवा.. “माझ्यामुळे इतरांच्या आनंदावर किंवा आरोग्यावर हानी तर होणार नाही ना?”

Leave A Reply

Your email address will not be published.