दैनिक लोकशाहीची दैदिप्यमान ६९ वर्षाची वाटचाल

0
  • शांताताईंनी लावलेल्या वृक्षाचे राजेश ने केले वटवृक्षात रूपांतर
  • कालानुरूप बदलत गेले लोकशाही चे रूप

लोकशाही न्यूज नेटवर्क  : १ मे २०२३ रोजी दै. लोकशाहीचा ६९ वा वर्धापन दिन.. ६९ वर्षे एखाद्या दैनिकाच्या कालावधी तसा फार मोठा काळ म्हणावा लागेल. कारण स्पर्धेच्या युगात अलीकडे वृत्तपत्र व्यवसाय मोठ्या जिकरीचा बनला आहे. ६९ वर्षाच्या कालावधीचे सिंहावलोकन केले तर दै. लोकशाही हे प्रसारमाध्यमासाठी एक प्रेरणास्थान ठरणारे म्हणता येईल. तसेच महिला संपादिकेने चालवलेले दै. लोकशाही एक आदर्शच होय.

स्वतः:चे भांडवल नाही, राजकीय पाठबळ नाही, त्यातही अल्प संख्यांक अशा  प्रतिकुल परिस्थितीत केवळ जिद्द आणि वेगळ्या वाटेने जाण्याचा विचार यामुळेच शांता वाणी आणि कमलाकर वाणी यांनी हा खडतर मार्ग स्वीकारला. यासाठी त्यांना त्यांच्या सासु द्रौपदाबाई सासरे गंगाधर मामा यांचा भक्कम पाठींबा मिळाला.

स्वातंत्र्यपूर्व काळात वृत्तपत्रे स्वातंत्र्य लढ्याला अथवा स्वातंत्र्य चळवळीला पूरक वातावरण करण्यासाठी वाहिलेले होते. स्वातंत्र्यानंतर देशाच्या विकासासाठी मदत स्वरूप भूमिका घेत होते. त्यानंतर मात्र वृत्तपत्रांना व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाले. १९५५ मध्ये भुसावळचे स्वातंत्र्यसैनिक अमृत हरी देशपांडे यांनी संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या पुरस्कार करण्यासाठी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला बळकटी मिळवण्यासाठी भुसावळ येथून लोकशाही वृत्तपत्र साप्ताहिक स्वरूपात सुरू केले.

१ मे १९६० रोजी संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाल्यानंतर लोकशाही वृत्तपत्र कायमस्वरूपी सुरू राहावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यासाठी एका चांगल्या व्यक्तीच्या शोधात ते होते. भुसावळला सौ शांता कमलाकर वाणी आणि कमलाकर गंगाधर वाणी हे दाम्पत्य यावल वरून भाऊबंदीच्या हिस्से वाटेनंतर भुसावळ येथे वास्तव्याला होते. यावलला वाणी कुटुंबीयांचे टायपिंगचे क्लास होते. हिस्सेवाटेनंतर एक टायपिंग मशीन घेऊन ते दांपत्य भुसावळला आले. ६०० रुपयांच्या पुंजीवर व्यवसायास प्रारंभ केला. आणि वसंत टाकीज जवळ एका छोट्याशा खोलीत संसार थाटला. सौ शांताताई यांचे पती कमलाकर वाणी जिल्हा माहिती खात्यात शासकीय सेवेत कार्यरत होते. यावल वरून जळगावला अपडाऊन करण्यापेक्षा भुसावळ जळगाव अपडाऊन करणे त्यांना सोपे झाले होते. भुसावळात सौ शांताताई व कमलाकर वाणी यांनी टायपिंगची कामे करून चरितार्थ चालवण्या सोबतच जनसंपर्कही वाढवला.

याच कालावधीत स्वातंत्र्य सैनिक अमृत हरी देशपांडे यांची या वाणी दांपत्याशी भेट झाली. ‘सौ शांताताई आणि कमलाकर वाणी हे लोकशाही वृत्तपत्र चालवू शकतात’ असा त्यांना विश्वास निर्माण झाला. अमृत हरी देशपांडे यांनी शंभर रुपयात लोकशाही वृत्तपत्राची मालकी सौ शांताताई यांचेकडे सुपूर्त केली.

सौ शांताताई लोकशाही हे साप्ताहिक विकत घेतल्यानंतर द्विसाप्ताहिकाचे भुसावळ प्रकाशन सुरू केले. पती कमलाकर वाणी जिल्हा माहिती खात्यात शासकीय सेवेत कार्यरत होते. शासकीय सेवेतून आल्यानंतर द्वि साप्ताहिक लोकशाही वृत्तपत्राला ते देखील सहकार्य करायचे. भुसावळात द्वि साप्ताहिक लोकशाहीचे वाचक संख्या वाढू लागली. वाचकांची मागणी लक्षात घेऊन शांताताई यांनी साप्ताहिकाचे रूपांतरण साधारणता १९७७-८० च्या कालावधीत सायं दैनिकात १५ पैसे किमती नंतर २५ पैसे किंमत ठेऊन केले. लोकशाही सायं दै. भुसावळच्या बाजारपेठेत ओरडून विकला जाऊ लागला. अंक ओरडून विकणाऱ्या रतन याची ख्याती पण भुसावळ शहरात होती. सायं दैनिक म्हणून भुसावळमध्ये लोकशाहीचा बोलबाला सुरू झाला. एक महिला संपादिकेने चालवीत असलेले सायं दैनिक म्हणून लोकशाहीला वाचकांचा वेगळा कौल मिळाला.

१९७५ मध्ये आंतरराष्ट्रीय महिला वर्ष होते त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते एकमेव महिला संपादिका म्हणून महाराष्ट्र शासनाने सुवर्ण पदक देऊन गौरविले होते. ए फोर आकारानंतर ट्यब्युलर आकाराचे सायं दै. लोकशाही प्रसारित होऊ लागले. दरम्यान छोट्याशा रूमची जागा अपुरी पडायला लागली म्हणून कोर्टाच्या पाठीमागे मोठी रूम भाड्याने घेण्यात आली. त्या ठिकाणी टायपिंगची सर्व प्रकारची कामे करून मिळायची. टायपिंग मध्ये सर्व प्रकारची कामे करून मिळण्याचे ठिकाण म्हणून सौ शांताताई यांचे एक नवीन दालन भुसावळ करांसाठी खुले झाले. त्यासाठी भुसावळ शहरच नव्हे तर जळगावच्या जिल्ह्याच्या ठिकाणाहून सुद्धा अनेक जण शासकीय विविध कामांचे टायपिंग करायला येत असत. याचा परिणाम जनसंपर्क आणखी वाढला. त्याचा फायदा त्यांच्या व्यवसायाबरोबरच सायं दैनिकातही मिळू लागला. भुसावळ शहरात कोर्टाच्या समोरील काळे बिल्डिंग ही शांताताई आणि कमलाकर वाणी यांच्या अचूक कामकाजामुळे नावारुपाला आली. शासकीय कामकाजात लागणारी सर्व फॉर्म मिळण्याचे भुसावळ शहरातील त्यावेळेचे एकमेव ठिकाण होते.

‘टायपिंगच्या’ या ओळखीबरोबरच ‘लोकशाहीच्या शांताताई’ म्हणून भुसावळात त्यांची नवी ओळख निर्माण झाली. सायं दैनिक लोकशाहीच्या संपादिका सौ शांताताई यांचा उत्साह वाढला. त्यानंतर खऱ्या अर्थाने त्यांच्या पत्रकारितेला सुरुवात झाली, आणि १९८७-८८ च्या काळात सायं दैनिक लोकशाहीचे रूपांतर दैनिकात करण्यात करण्याचा धाडसी निर्णय सौ शांताताई यांनी त्यांचे पती कमलाकर वाणी आणि कार्यतत्पर मुलगा राजेश यांच्या सहकार्याने घेतला. कमलाकर वाणी यांनी शासकीय सेवेतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. पुढे भुसावळ येथून दै. लोकशाहीचे आगमन जळगाव येथे झाले. सुरेशदादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही चे रोपटे रोवले गेले. सुरुवातीच्या काळात राजेश यावलकर यांनी जे परिश्रम घेऊन आपला जनसंपर्क वाढवला आणि शांता ताई यांनी लावलेल्या रोपट्याचे वटवृक्ष मध्ये रूपांतरित होण्यास प्रारंभ झाला. त्या संदर्भात तसेच सौ शांताताई आणि कमलाकर वाणी यांना पत्रकारिता करण्यासाठी कुटुंबियांनी जे सहकार्य केले म्हणून त्याहून दैनिकाची वाटचाल पुढे होऊ शकली. त्याचा उहापोह पुढच्या भागात…!

Leave A Reply

Your email address will not be published.