वाढदिवशीच मित्राचा ‘सर्पमित्रा’ने केला घात

फोटो काढण्यासाठी हातात दिला विषारी साप

0

 

बुलढाणा | लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

मित्र आणि सर्पमित्र या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. मुळात विषारी सापांना पकडून जंगलात सोडून जीवनदान देणारे म्हणून सर्पमित्रांना ओळखले जाते. आणि मित्र ही संकल्पना विशेषत्वाने सांगण्याची गरजच नाही. मात्र चिखलीत एका सर्पमित्राने आपल्याच मित्राच्या हाती विषारी साप देत त्याच्या वाढदिवशीच त्याचा बळी घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी दोन मित्रांवर चिखली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या दोन्ही मित्र फरार आहेत.

 

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली परिसरात गजानन नगर येथे राहणारा संतोष जगदाळे (वय 31) याचा 5 जुलैला वाढदिवस  होता. वाढदिवसानिमित्ताने कुटुंब, नातेवाईकांनी त्याचे पारंपरिक पद्धतीने औक्षण केले. त्यानंतर केक कापत त्याचा वाढदिवसही साजरा कण्यात आला. यानंतर गजानन नगर येथील त्याचे दोन मित्र वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. त्यावेळी संतोषचा वाढदिवस साजरा करायचा म्हणून या कथित मित्रांनी संतोषला बाहेर आणले.

 

अशी घडली घटना

संतोष जगदाळे याचा वाढदिवस साजरा करत असताना त्याच्या एका मित्राने फोटो काढण्याच्या बहाण्याने संतोषच्या हातात विषारी साप देण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या विषारी सापाने संतोषच्या हाताला दंश केला. यानंतर त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र सापाचे विष अंगात भिनल्याने संतोष जगदाळेचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे आनंद साजरा करणाऱ्या जगदाळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला.

 

वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

याप्रकरणी संतोषच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरुन, सर्पमित्र आरिफ खान रहीस खान आणि धीरज पंडितकर या दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. आरिफ खान हा सर्पमित्र असून तो नेहमी विविध प्रकारचे साप सोबत बाळगतो, असे बोललं जाते. या प्रकरणानंतर आरिफ खान आणि धीरज पंडितकर हे दोघेही फरार झाले झाले आहे. सध्या पोलिसांकडून या दोघांचाही तपास सुरु आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.