लोकशाही न्यूज नेटवर्क

नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा अशोक खरात याच्या कथित कारनाम्यांवर आधारित एक नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपाली सय्यद महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात त्या राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारू शकतात, अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
चित्रपटाबाबत बोलताना दीपाली सय्यद यांनी सांगितले की, ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर आल्यानंतर त्यांना भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची माहिती मिळाली. या चित्रपटात आपण महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचे त्यांनी मान्य केले. मात्र, आपल्या भूमिकेबाबत त्यांनी अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही.
समाजाला सतर्कतेचा इशारा देताना त्या म्हणाल्या, “अशा भोंदूबाबांपासून प्रत्येकाने सावध राहिले पाहिजे. समाजात असे अनेक खरात आजही कुठे ना कुठे लपून बसलेले असू शकतात.” तसेच, “माझी भूमिका नेमकी काय आहे, हे मी आत्ताच सांगणार नाही. ते प्रेक्षकांना चित्रपटातूनच पाहायला मिळेल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याबाबतही काही आरोप चर्चेत आले होते. याविषयी विचारले असता, दीपाली सय्यद यांनी सूचक प्रतिक्रिया दिली. “राजकारणात काम करणाऱ्या व्यक्तींवर आरोप होतच असतात. मात्र, या संपूर्ण प्रकरणात रुपाली चाकणकर यांचा प्रत्यक्ष हात होता की नाही, हे चित्रपट पाहिल्यानंतर स्पष्ट होईल,” असे त्या म्हणाल्या.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामागील सत्य, तसेच राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा उलगडा या चित्रपटातून होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यामुळे चित्रपटाचे कथानक आणि दीपाली सय्यद यांच्या भूमिकेबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.


