जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीतच थेट संघर्ष होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. शिवसेना (शिंदे गट)च्या नगरसेविका तथा अपक्ष उमेदवार रेश्मा काळे यांनी सर्व प्रकारच्या राजकीय दबाव आणि मनधरणीनंतरही आपली उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. परिणामी ही निवडणूक आता चौरंगी होण्याची शक्यता निर्माण झाली असून स्थानिक राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने शरद तायडे यांना रिंगणात उतरवले आहे. शिवसेना (शिंदे गट)च्या नगरसेविका रेश्मा काळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवला असून अपक्ष उमेदवार म्हणून अनिल चौधरी देखील निवडणुकीच्या मैदानात आहेत. त्यामुळे मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र जवळपास स्पष्ट झाले आहे.
महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील अंतर्गत मतभेद या निवडणुकीच्या निमित्ताने उघडपणे समोर आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजपने अधिकृत उमेदवार म्हणून नंदकिशोर महाजन यांना मैदानात उतरविल्यानंतर रेश्मा काळे यांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्वतः पुढाकार घेत सकाळपासून विविध स्तरांवर चर्चा आणि मनधरणी केली. मात्र या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळाले नाही. रेश्मा काळे यांनी अखेरपर्यंत आपली भूमिका कायम ठेवत उमेदवारी मागे घेण्यास नकार दिला. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. महायुतीतील मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून त्याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
दरम्यान, रेश्मा काळे यांच्या उमेदवारीमागे शिवसेना (शिंदे गट)मधील काही प्रभावी नेत्यांचा आणि आमदारांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. अधिकृतरीत्या याबाबत कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नसली तरी पडद्यामागील घडामोडींमुळे या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विरोधी पक्ष म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार शरद तायडे हे देखील निवडणुकीत सक्रिय झाले आहेत. अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांची देखील निवडणुकीतील उपस्थिती काही समीकरणे बदलू शकते, अशी चर्चा आहे. त्यामुळे कोणत्या उमेदवाराला कोणत्या गटाचे मताधिक्य मिळते आणि अंतिम टप्प्यात कोणाची रणनीती यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीतील अंतर्गत संघर्ष, बंडखोरीचे स्वरूप आणि मतांच्या संभाव्य विभागणीमुळे ही निवडणूक केवळ औपचारिक राहिलेली नाही. उलटपक्षी, स्थानिक राजकारणातील भविष्यातील समीकरणे ठरविणारी महत्त्वाची लढत म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे. विशेष म्हणजे महायुतीतीलच दोन उमेदवार निवडणुकीच्या मैदानात ठामपणे उभे राहिल्याने निवडणूक अधिक रंगतदार झाली आहे.


