लोकशाही न्यूज नेटवर्क

त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धनखड यांचा मृतदेह अगरतळा येथील पोलीस मुख्यालयात आढळून आल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे पोलीस विभागासह प्रशासकीय वर्तुळातही मोठी चर्चा सुरू झाली आहे. त्यांचा मृतदेह तातडीने अगरतळा येथील गोविंद बल्लभ पंत रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अनुराग धनखड यांचा मृतदेह त्यांच्या केबिनमध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळून आला. प्राथमिक अंदाजानुसार, आत्महत्येची शक्यता व्यक्त केली असली तरी अधिकृतरीत्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे मृत्यूमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलीस आणि फॉरेन्सिक पथकांकडून सखोल तपास सुरू करण्यात आला आहे.
अनुराग धनखड हे १९९४ बॅचचे भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या. २०२५ मध्ये त्यांची त्रिपुराच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले होते.
धनखड यांनी सीबीआयमध्ये कार्यरत असताना देशातील गाजलेल्या नीरव मोदी प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केले होते. तसेच १९८४ मधील शीखविरोधी दंगलींच्या तपासासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाचे SIT चे नेतृत्वही त्यांनी केले होते. त्यामुळे ते एक अनुभवी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे पोलीस दलात शोककळा पसरली असून, त्यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय? याचा तपास सुरु आहे.


