लोकशाही संपादकीय लेख

महाराष्ट्रात आधीच पावसाचे प्रमाण कमी झाले आणि त्यातच आता एक महिना पाऊस लांबणार आहे. शेतकरी वर्गात या बातमीमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. उशिरा का होईना, थोडाफार चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पेरण्या आटोपल्या. आता पिकांची वाढ होत असताना जर पावसाने आणखी दडी मारली तर पिकांची वाढ खुंटणारच, त्याचबरोबर काही ठिकाणी झालेल्या पेरण्या करपून जातील. म्हणजे पिकांची वाढ तर खुंटणारच, त्याचबरोबर काही ठिकाणी पेरणी झालेली पिके करपून जातील. म्हणजे उत्पन्न शून्यावर येणार हे ठरलेले आहे.
ऑगस्टच्या अर्ध्या महिन्यात पावसाविना दिवस गेले आणि आता सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येईल, असा हवामान खात्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांच्या तोंडाचे पाणी पळाले आहे. पाऊस नाही आला तरी हवामान ढगाळ असेल तर पिके थोडी तग धरतील; पण उन्हाळ्यासारखे ऊन पडणार आहे. हवामान एकदम उष्ण होत आहे. कडक उन्हामुळे तापमान वाढ होऊन जमिनीतील आहे तो ओलावाही उष्णतेमुळे निघून जाणार असल्याने पिके एकतर करपून जातील किंवा आलेल्या पिकांची वाढ खुंटणार आहे. म्हणजे जेथे एकरी २० क्विंटल उत्पन्न येईल, तिथे चार ते पाच क्विंटल उत्पन्नाच्या वर शेतकऱ्यांना समाधान मानावे लागेल.
महाराष्ट्रातील शेतकरी दुहेरी कात्रीत सापडला आहे. सुरुवातीला पेरण्या झाल्या नसत्या तर दुबार पेरणीसाठी शासनाकडे मागणी करता आली असती. काही जिल्ह्यांत दुबार पेरण्याही झालेल्या आहेत; पण आता पेरणी होऊन एक महिना झाला, पिकांची वाढही सुरू झाली आणि अशात जर पाऊस नाही आला तर खरीपाचे पीक गेल्यात जमा आहे. पिके वाचली तरी त्यांचे उत्पन्न मात्र अल्प प्रमाणात येणार असल्याने शेतकरी धड खरिपाचे पीक व्यवस्थित घेईल ना रब्बीचे पीकही त्याला घेता येणार आहे. रब्बीचे पीक घ्यायचे म्हटले तर त्याला खरिपाचे पीक पाडून रब्बीच्या पिकाची पेरणी करावी लागेल.
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या नशिबी हे दृष्टचक्र पाचवीला पुजलेले आहे. यंदा पावसाचे प्रमाण कमी म्हणून पिके गेली नाही तर जास्त पाऊस झाला म्हणून पिके गेली, असे शेतकऱ्यांच्या नशिबी दृष्टचक्र आहे. यावर एकच उपाय म्हणजे जमीन पूर्ण सिंचनाखाली आणली तरच हे दृष्टचक्र थांबेल. अन्यथा हे असेच चालू राहील. तोपर्यंत निसर्गावर शेतकरी अवलंबून आहे, तोपर्यंत निसर्गाच्या लहरीप्रमाणे त्याला सामना करावा लागेल.
आपल्या राज्यात ३० टक्के शेती सिंचनाखाली आहे आणि बाकी ७० टक्के शेती ही निसर्गाच्या पाण्यावर अवलंबून आहे. म्हणजे ७० टक्के शेतकऱ्यांच्या जमिनी या जिराईत आहेत. जोपर्यंत हे जिराईत क्षेत्र सिंचनाखाली येणार नाही, तोपर्यंत निसर्गाच्या लहरीप्रमाणे त्याला झळा सोसाव्या लागतील. स्वातंत्र्य मिळून ८० वर्षे झाली, पण आपल्या शेतातील सिंचनाची परिस्थिती काही सुधारली नाही. जोपर्यंत सिंचन वाढणार नाही, तोपर्यंत हे असेच चालू राहील.


