लोकशाही संपादकीय लेख

एरंडोल शहरात अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या किशोर बाविस्कर नावाच्या इन्स्पेक्टरने शहरात धाडी टाकून गुटखा जप्त केला. या धाडीने टपरीधारक, पानटपरीवाले आणि इतरांवर छापे टाकले. त्यांच्याकडून 20 हजार रुपयाचा दंड वसूल केला. दंड म्हणण्यापेक्षा ही एक प्रकारची खंडणीच वसूल केली होती. खंडणी वसूल करूनही त्यातील काहींवर गुन्हा दाखल केला होता. ही बातमी आमदार अमोल पाटील यांना कळली. त्यांनी तातडीने एरंडोल पोलीस स्टेशन गाठले आणि तेथील पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक गायकवाड यांना याबाबतीत माहिती विचारली तेव्हा गायकवाड यांनी सांगितले की, तीन ते चार जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत.
पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हे सांगताच आमदार अमोल पाटील यांनी त्यांचा रुद्रावतार धारण केला. कोणीतरी त्रयस्थ व्यक्तीने या प्रकरणी फोन करून हे गुन्हे दाखल करण्यास सांगितल्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आल्याचे आमदार अमोल पाटलांना समजले, तेव्हा अमोल पाटील म्हणाले, माझ्या मतदारसंघात कोणी त्रयस्थ माणूस हस्तक्षेप करतोय हे मला चालणार नाही. त्यांनी त्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करा म्हणून हट्ट धरला. त्याबाबत एरंडोलचे पोलीस निरीक्षक आमदार अमोल पाटील यांना समजाविण्याचा पूर्ण प्रयत्न केला, परंतु त्यांचा पारा वाढत गेला. तब्बल साडेचार तास त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये आपला ठिय्या कायम चालू ठेवला.
दरम्यानच्या काळात शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने तेथे जमा झाले आणि पोलीस स्टेशनला छावणीचे रूप आले. दरम्यानच्या काळात अमोल पाटलांना समजावण्याचा पोलीस निरीक्षकांकडून प्रयत्न झाला, पण त्यांचा रुद्रावतार आणखीनच वाढला. मला माहित नाही काहीही करून त्या किशोर बाविस्कर विरुद्ध गुन्हा दाखल झालाच पाहिजे. एक तर छोट्या छोट्या पानटपरी धारकांवर व छोटे दुकानदारांविरुद्ध कारवाई करायची. कारवाईच्या नावाखाली या छोट्या दुकानदारांकडून 20 हजाराची खंडणी वसूल करायची.. तेव्हा त्या किशोर बाविस्कर वर खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, तो दाखल झाल्याशिवाय मी पोलीस स्टेशन मधून ठिय्या सोडणार नाही, या आमदार अमोल पाटलांच्या रुद्रावतारावर पोलीसही हतबल झाले. शेवटी रात्री साडेदहाच्या सुमारास किशोर बाविस्कर यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला.
दरम्यान एरंडोल पोलीस स्टेशन स्टेशनला आलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांकडून छावणीचे स्वरूप आले होते. जे काम अर्धा तास ते तास भरात होणार होते त्याला तब्बल साडेचार तास लागले. त्यात आमदार अमोल पाटील हे हिरो बनले. गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी हलणार नाही, ही हट्टी भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांचा राग हा होता की, त्या किशोर बाविस्कर ने सांगितले की, जी खंडणी वसूल केली होती त्या संदर्भात जर दुसऱ्या कोणाचा फोन आला असता तर मी गुन्हा दाखल केला नसता. आमदार अमोल पाटलांचा फोन आला म्हणून मी गुन्हा दाखल केला, हे त्या किशोर बाविस्कर यांचे म्हणणे आमदार महाशयांना अत्यंत बोचले होते. त्याचा वचपा त्यांनी त्या ठिय्या आंदोलनातून काढला आणि अखेर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.
आमदार अमोल पाटलांनी लहान टपरी धारकांसाठी जे केले ते योग्यच केले असे म्हणता येईल. मोठे मासे सोडून छोटे मासे गळाला लावायचे, त्यांच्याकडून कारवाईच्या नावावर खंडणी वसूल करायची ही त्यांची पद्धत असते. अशांना सोडता कामा नये आमदार अमोल पाटलांनी जे केले त्याबद्दल त्यांचे आणि अभिनंदनच करायला हवे, कारण गरीब लोकांना कोणीतरी वाली आहे असे गरिबांना वाटले पाहिजे. परंतु आमदार अमोल पाटील यांनी प्रत्येक गरिबाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. पण अनेक वेळा तसे होत नाही. ते होऊ नये ही अपेक्षा. पोलीस स्टेशनमध्ये आमदार अमोल पाटील म्हणायचे की, माझे कार्यकर्ते खंडणी वसूल करतात किंवा गुंडगिरी करतात असे एक तरी उदाहरण मला द्या.
अलीकडे कर्मचाऱ्यांसाठी पोलीस स्टेशन गाठणे तेथे कार्यकर्त्यांची बाजू मांडणे हे अलीकडे सर्वच आमदारांकडून होते आहे, तसे आमदार अनिल पाटलांकडूनही झाले. त्याचा अर्थ असा नाही की सर्व पानटपरीवाले व छोटे दुकानदारांनी अवैध धंदे करावेत. पण पोलीस स्टेशन मधील ठिय्या आंदोलनात आमदार अमोल पाटलांचा रुद्रावतार पाहिला मिळाला. तो यापूर्वी कधी दिसला नव्हता. प्रत्येक चांगल्या बाजूची तरफदारी करणे हे आमदारांचे कर्तव्य आहे, तसे ते त्यांनी केले. याबद्दल आमदार अमोल पाटील यांचे पुन्हा एकदा अभिनंदन..!


