लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. २३ जुलै ते ६ ऑगस्टपर्यंत मुंबईत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांकडून ही जमावबंदी लागू करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांकडून मुंबई शहरामध्ये १५ दिवसांसाठी जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहे. २३ जुलै २०२६ रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून ते ६ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतही सार्वजनिक शांतता भंग होण्याची, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची तसंच मालमत्तेचे नुकसा होण्याची शक्यता लक्षात घेता जमावबंदी लागू करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.
या गोष्टींवर असणार बंदी?
- पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई असणार आहे.
- कोणत्याही प्रकारच्या मिरवणुकांवर बंदी असणार आहे.
- मिरवणुकांमध्ये लाऊडस्पीकर, वाद्ये, बँड आणि फटाके फोडण्यास बंदी असणार आहे.
या बाबीना मिळाली सूट!
- सर्व प्रकारच्या विवाह समारंभावर बंदी नसणार आहे.
- अंत्यसंस्कार सभा आणि स्मशानभूमी / दफन मार्गाच्या मिरवणुकीवर बंदी नाही.
- कंपन्या, क्लब, सहकारी संस्था, इतर संस्था आणि संगटनांच्या कायदेशीर बैठकावर बंदी नाही.
- सामाजिक मेळावे, क्लब, सहकारी संस्था, सोसायट्या आणि संघटना यांचे सामान्य व्यवहार करण्यासाठीच्या बैठकांवर बंदी नाही.
- चित्रपटगृहे, नाट्यगृहे, शैक्षणिक संस्था, सरकारी कार्यालये, न्यायालये, दुकाने, कारखाने आणि नियमित व्यावसायिक कामकाज यावर बंदी नाही.
- संमेलने आणि मिरवणुकी ज्यांना विभागीय पोलिस उपआयुक्त यांनी परवानगी दिली आहे त्यावर बंदी नाही.


