खामगाव सामान्य रूग्णालयात मर्जीतील लोकांचे लसीकरण

0

खामगाव(गणेश भेरडे) : राज्यात सर्वत्रच कोवैक्सीन व कोविड लसीकरणाचा तुटवडा आहे. तरीही लसीकरण के्ंरदावर नागरिकांची झुंबड उडून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत आहे. मात्र येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालयात मर्जीतील लोकांचे लसीकरण करून देण्यात असून त्यासाठी रूग्णालय अधिकार्‍यांनी खास मुजोर सुरक्षा रक्षकाची नियुक्ती केल्याचे आज 7 मे रोजी दिसून आले. यामुळे लसीकरणासाठी नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांची हेळसांड होत होती. तर लसीकरणासाठी झुंबड उडाल्यामुळे सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडत असताना सुरक्षा रक्षक लसीकरणात व्यस्त असल्याचे दिसून येते होते. याप्रकरणी चौकशी करून लसीकरणात गैरप्रकार करणार्‍या अधिकार्‍यांविरूध्द कारवाई करण्याची मागणी होत आहे.

स्थानिक सामान्य रूग्णालयातील कोविड लसीकरण केंद्रावर व्हीआयपी व त्यांच्या मर्जीतल्या लोकांनी जणूकाही ताबा घेतला असल्याचे आज 7 मे रोजी दिसून आले. तर यासाठी बाह्यरूग्ण विभागाच्या गेटवर तैनात सुरक्षा रक्षक नोंदणी केलेल्यांना बाहेरचा तर मर्जीतल्या लोकांना आतील रस्ता म्हणजेच लसीकरण केंद्रात सोडत होता. त्यामुळे नाव नोंदवूनही वेळ मिळालेल्या नागरिकांना काही दिवसांपासून लसीकरणाविना परत जावे लागत आहे. यामुळे लसीकरण केंद्रावर एकच गोंधळ उडत आहे. ऑनलाईन नोंदणी व बुकींग केलेले नागरिक लस न घेता मनस्ताप सहन करत परत जात आहेत, तर मर्जीतील लोकांच्या प्राधान्यामुळे सर्वसामान्यांना नाहक हेलपाटे पडत आहेत. यासंदर्भात भाजपा पदाधिकारी तथा रूग्ण कल्याण समितीचे सदस्य संजय शिनगारे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
45 वर्षावरील नागरिकांची गोची- 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींसाठीच लसींचा साठा वापरण्याचा अजब फतवा राज्य शासनाने काढला आहे.

त्यामुळे 45 आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांची लसीकरणासाठी कोंडी होत आहे. तर हा फतवा निघण्या अगोदर ज्यांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे, त्यांना मात्र लस देण्यात यावी असे आदेशात नमूद असताना सुध्दा अशा रूग्णांनी लसविना परत पाठविण्यात आले आहे. लसीकरणाला प्राप्त झालेल्या राजकारणाचा फटका अनेकांना बसत असल्याचे दिसून येते. लसीकरण केंद्रावर वारंवार चकरा मारूनही लस मिळत नसल्याने अनेकांचा मानसिक ताण वाढला आहे. लसीकरण केंद्रावर कोव्हॅक्सीन लसीचा डोस उपलब्ध नसल्यामुळे पहिली लस घेऊन 45 दिवस लोटलेल्यांचीही लसीकरणासाठी वनवन सुरू आहे.

ग्रामीण जनता अडचणीत- शहरी भागातील नागरिक मोबाईल अ‍ॅपव्दारे लसीकरणासाठी जेव्हा ऑनलाईन नोंदणी करतात त्यावेळी त्यांना जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र देण्यात येते. तर ग्रामीण भागातील बहुतांश जनतेकडे ऑनलाईनची सुविधा नसल्यामुळे याचा लाभ शहरातील नागरिकांना मिळतो. त्यामुळे ग्रामीण जनता लसीकरणाबाबत अडचणीत आल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.