धक्कादायक : रेमडेसिवीरने 90 जणांची प्रकृती बिघडली, इंजेक्शन्सचा वापर थांबवण्याचे आदेश

0

पेण : राज्यभरात रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत उलट सुलट बाबी समोर येत असताना रायगडात रेमडेसीवर इंजेक्शन घेतल्यावर ९० जणांची प्रकृती बिघडली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. रायगड जिल्ह्यात हेटेरो हेल्थ केअर कंपनीकडून वितरीत करण्यात आलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश अन्न औषध प्रशासनाने जारी केले आहेत. कोविफोर नामक इंजेक्शनच्या एचसीएल २१०१३ बॅचचा वापर करू नये असे निर्देश रायगड जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांना जारी केले आहे.

कंपनीकडून देण्यात आलेल्या इजेंक्शनचे रुग्णांवर प्रतिकूल परिणाम झाल्यांची गंभीर बाब समोर आली आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याबाबत राज्यसरकारला कळविण्यात आले असल्याचे त्यांनी कळवले आहे. आधीच रेमडेसिवीर इंजेक्शनचा जिल्ह्यात तुटवडा जाणवत होता. आता दुषित रेमडेसिवीरचा पुरवठा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. काही रुग्णांना हेटेरो हेल्थकेअर कंपनीची कोविफोर नामक लस दिल्यानंतर त्रास झाल्याची बाब समोर आली. अशाच प्रकारच्या तक्रारी रायगडसह पालघर व पुण्यात देखील आल्याने खळबळ उडाली आहे.

या इंजेक्शनच्या ५०० लसी जिल्ह्याला प्राप्त झाल्या होत्या. यापैकी १२० लसी रुग्णांना देण्यात आल्या. यातील ९० जणांना लस घेतल्यावर त्रास जाणवला. रुग्णांवरील प्रतिकूल परिणाम लक्षात घेऊन हेटेरो हेल्थकेअर कंपनीने कोविफोर नावाच्या बँच नंबर एचसीएल २१०१३ इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याची विनंती केली. याबाबत कंपनीच्या वतीने एक पत्र गुरुवारी जारी करण्यात आले. तांत्रिक कारणामुळे या बॅचमधील सर्व रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर थांबविण्यात यावा असे यात नमुद करण्यात आले. यानंतर पेण येथील सहाय्यक आयुक्त अन्न औषध प्रशासन गी. दी. हूकरे यांनी या बॅचमधील सर्व कोविफोर इंजेक्शनचा वापर तातडीने थांबविण्याचे आदेश सर्व रुग्णालयांना आणि वितरकांना दिले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.