कोविशील्ड लसीच्या किमती राज्य सरकारांसाठी 100 रुपयांनी कमी; पुनावालांची घोषणा

0

पुणे: देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणासाठी आजपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे. लस उत्पादक कंपन्यांनी कोरोना लसीच्या किमती कमी कराव्यात, अशी विचारणा केंद्र सरकारनं सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकला केली होती. कोविशील्ड लसीच्या किमती राज्य सरकारांसाठी 100 रुपयांनी कमी करत आहोत, अशी माहिती सीरमचे प्रमुख आदर पुनावाला यांनी दिली आहे. आदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटद्वारे दिली.

आदर पुनावाला यांनी ट्विट करत कोविशील्ड लसीच्या किमती कमी करत आहोत. राज्य सरकारासाठी कोविशील्डच्या एका लसीच्या डोसची किंमत 400 वरुन 300 रुपये करत आहोत, अशी घोषणा आदर पुनावालांनी दिली. लसीच्या कमी केलेल्या किमती तात्काळ लागू होतील. कोविशील्डच्या लसीची किंमत कमी केल्यानं देशातील नागरिकांचे जीव वाचवण्यासाठी मदत होईल, असं पुनावाला म्हणाले.

सीरमच्या कोविशील्ड लसीचे जुने दर

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी भारत सरकारच्या सूचनेनुसार कोविशील्ड लशीची किंमत निश्चित केली होती. एसआयआयने राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराची घोषणा केली होती.

भारतात सध्या दोन लस मान्यताप्राप्त

सीरम इन्स्टिट्यूट निर्मित ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस ‘कोविशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोवॅक्सिन’ यांना मान्यता देण्यात आली आहे. केंद्र सरकारने 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 1 मेपासून लस देण्याची घोषणा केली होती आणि असेही म्हटले होते की, लसीकरणाच्या तिसर्‍या टप्प्यातील भाग लस उत्पादक कंपन्यांनी आपल्या केंद्रीय औषध प्रयोगशाळेमधून (सीडीएल) 50 टक्के पुरवठा केंद्र सरकारला द्यावा आणि उर्वरित 50 टक्के पुरवठा राज्य सरकारांना व खुल्या बाजारात विकण्यास त्यांना परवानगी असेल.

Leave A Reply

Your email address will not be published.