लाईफ लाईनच्या डॉ. आशिष अग्रवालकडून ऑडिओ क्लीप व्हायरल करून पत्रकारांना धमकी

0

खामगाव (प्रतिनिधी)- स्थानिक नांदुरा रोडवरील लाईफ लाइन हॉस्पीटलचा संचालक असलेला डॉ. आशिष अग्रवाल याने अनधिकृत कोविड सेंटरच्या माध्यमातून रूग्णांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरू केला असून त्यामध्ये काहींचा बळी गेला आहे. यासंदर्भात रूग्ण नातेवाईकांच्या तक्रारीवरून काही प्रसार माध्यमामध्ये वृत्त प्रकाशित करण्यात आले. त्यामुळे डॉ. अग्रवाल याने ंकाल 27 एप्रिल रोजी रात्री आपल्या भ्रमणध्वनीवरून स्वतच्या आवाजात ऑडिओ क्लीप व्हायरल करून काही पत्रकारांना संबोधत ठेचून चटणीसोबत खाऊन टाकेल, तुम्हाला माहितही नाही पडणार..आलं का लक्षात!. अशा अशोभनीय भाषेत बोलून जीवघेणी धमकी दिल्याचा निंदनीय प्रकार घडला आहे. यासंदर्भात शहर पोलिस स्टेशनला तक्रार देण्यात आल्याची माहिती मिळाली असून याप्रकरणी प्रशासन काय कारवाई करते याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

बुलढाणा जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या यादीत खामगाव शहरातील केवळ 4 खाजगी कोविड सेंटर असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामध्ये डॉ. अग्रवाल याच्या लाईफ लाईन हॉस्पीटलचा समावेश नसून डॉ. अग्रवाल याने मागील वर्षी कोविड सेंटरची परवानगी घेतली होती. मात्र यावेळी नुतनीकरण केले नाही, म्हणजेच डॉ. अग्रवाल हा एकप्रकारे अनधिकृतपणे कोविड सेंटर चालवित असल्याच्या बाबीला आपत्ती व्यवस्थापन विभागानेही दुजोरा दिला आहे. अशा या डॉ. अग्रवाल याच्या कोविड सेंटर मध्ये कोरोना व कोरोना सदृश्य रूग्णांवर उपचार करण्याचा सावळागोंधळ सुरू होता. विशेष बाब म्हणजे रूग्णाची कोरोना टेस्ट न करता सरळ सरळ रेमडीसीवीर इंजेक्शनसह औषधोपचार करणे, याचा दुष्परिणाम म्हणजे यामध्ये आतापर्यंत 4 रूग्णांचा बळी गेला.

तर कोरोना ने मृत्यू झाला असताना मृतक रूग्णावर कोरोना प्रोटोकॉल प्रमाणे अंत्यसंस्कार न करता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देऊन त्यांनाही कोरोनाच्या जबड्यात ढकलण्याचे दुष्कृत्य करणे, रूग्ण लाईफलाईन मध्ये भरती असताना व येथेच डॉक्टरच्या भावाचे मेडिकल असताना एकदम 14 दिवसांची 14 रेमडीसीवीर इंजेक्शनसह भरमसाठ औषधी नातेवाईकांना आणावयास सांगणे, यापैकी 2-3 दिवसातच रूग्णाचा मृत्यू झाल्यास इंजेक्शनसह औषधांचा काळाबाजार करणे तसेच भरमसाठ बिल काढणे, अनधिकृत कोविड सेंटर असताना प्रशासनाकडून ऑडिट होत नसल्यामुळे रूग्णांची आर्थिक लूट करणे तर रूग्ण नातेवाईकांसोबतही गैरवर्तणूक करणे अशा स्वरूपाच्या तक्रारी रूग्ण नातेवाईकांकडून प्राप्त झाल्यामुळे वृत्त प्रकाशित करण्यात आले होते.

त्यामुळे कोविड सेंटरच्या नावाखाली चाललेला सावळा गोंधळ चव्हाट्यावर आणल्याने डॉक्टरने वरील अशोभनीय प्रकार केल्याचे बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.