एमआयडीसीच्या नावाखाली जेएसडब्ल्यू कंपनीच्या घशात जमीनी घालन्याचा प्रयत्न ; संजय जांभळे यांचा आरोप

0

पेण  –  एमआयडीसी च्या नावाखाली पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू या पोलाद निर्मिती करणाऱ्या  कंपनीच्या घशात येथील जमीनी  घालन्याचा शासनाचा कुटील डाव असून वडखळ, डोलवी, वावे परिसरातील शेतकरी हा शासनाचा डाव पूर्णपणे उधळून लावतील असा गंभीर इशारा रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय जांभळे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. पेण तालुक्यातील डोलवी एम.आय.डी.सी. साठी वावे, कोळवे, बेणेघाट, डोलवी, काराव, खारढोबी, खारचिर्बी, खारमाचेळा, खारजांभेळा, खारघाट या गावातील 2120 एकर जमीन संपादीत करण्यात येणार आहे.

या बाबत पेण प्रांताधिकारी कार्यालयात पेणचे आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. यावेळी एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. या बरोबरच जमीन संपादीत होणारे शेतकरी व ज्यांच्या जमिनीचे संपादन होणार नाही असेही शेतकरी उपस्थित होते, असेही संजय जांभळे यांनी सांगितले. ही जागा एम.आय.डी.सी. मार्फत स्वस्तात घेऊन जे.एस.डब्ल्यू स्टील कंपनीला देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. मात्र येथील शेतकरी याच्या पूर्णपणे विरोधात आहेत. दोन वर्षांपूर्वी शेतकऱ्यांनी जे.एस.डब्ल्यू.स्टील कंपनीला 85 ते 90 लाख रुपये एकरी या दराने जमीन देण्यात आली असताना आता शासन हेक्टरी दराने अत्यंत अल्प भावात जमीन खरेदी करुन शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे. केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे व राष्ट्रीय महामार्ग जमीन संपादन कायद्या प्रमाणे शासकीय दराच्या चारपटीने भाव द्यावा अशी मागणी संजय जांभळे यांनी यावेळी केली.

जमीन संपादन करण्यासाठी शासनाने कोणत्याही प्रकारची बळजबरी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडचे मावळे आहोत हे विसरू नये. आम्हांला भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांचा इतिहास आहे. त्याच प्रमाणे चिरनेर चा सत्याग्रह देखील आमच्या रक्तात आहे. आम्हाला शांती व क्रांती हे दोन्ही मार्ग अवलंबता येतात असा इशारा देखील संजय जांभळे यांनी दिला. शासनाने शेतकऱ्यां समोर बसून भूसंपादनाचा मोबदला काय देणार, नोकरी आदी बाबत बोलणी करावी नाहीतर शेतकरी आपल्या जमिनी कधीही देणार नाहीत असे म्हटले.

यावेळी संजय जांभळे यांनी त्यांच्या बद्दल खोट्या वावड्या उठवणाऱ्या राजकीय विरोधकांचा देखील चांगलाच समाचार घेतला. माझी पत्नी आजारी असल्याने त्या मिटींगला मी उपस्थित राहू शकलो नाही म्हणून काही स्थानिक पुढारी घाणेरडे राजकारण करत आहेत. कोणीही अश्या खालच्या पातळीवर जाऊन राजकारण करू नये असा इशारा त्यांनी यावेळी दिला. डोलवी परिसरातील झारीतील शुक्राचार्य यांनी समोरा समोर येऊन आरोप करावेत असे आव्हान देतानाच संजय जांभळे हा कायम शेतकऱ्यां बरोबर होता, आहे व यापुढे देखील राहणार असल्याचे शेवटी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.