आदिवासींच्या जमिनी लाटून भू-माफिया झाले जमीनदार

0

खामगाव (प्रतिनिधी):- शहरातील काही भूमाफिया अल्पावधीतच कसे काय गब्बर झाले? असा प्रश्न अनेकांना पडल्यावाचून राहिला नाही. आदिवासी व अनुसुचित जाती जमातीच्या व्यक्तींना भूमिहीन करता येत नाही,  मात्र भूमाफियांनी त्यांची मुळ जात बदलून बनावट जातीच्या प्रमाणपत्राआधारे त्यांच्या शेतजमिनी खरेदी करून त्यांना भूमिहीन करण्याचे पातक करून शेकडो एकर शेतीच्या माध्यमातून जमीनदार झाल्याची बाब समोर येत आहे.  मागील काही वर्षांपासून शहरातील काही भूमाफियांकडून अशा प्रकारे जमिनी खरेदीचा गोरखधंदा सुरू असल्याचे बोलले जात आहे.

शहरातील काही लोकांनी शेतजमिनी खरेदी विक्रीच्या व्यवहारात शिरकाव करून अल्पावधीतच गब्बर होण्याची किमया केली आहे. शासनाने अदिवासी व अनुसूचित जाती -जमातीच्या शेतजमीन खरेदीविक्री संदर्भात घालून दिलेल्या काही अटी व शर्ती भूमाफियांना अडचणीच्या ठरत आहे. त्यामुळे त्यांनी आपला हेतू साध्य करण्यासाठी नामी नामी शक्कल हे लढविल्याचा असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.  महसूल विभागातील काही अधिकार्‍याना हाताशी धरून आदिवासी व मागासवर्गीयांचे बनावट जात प्रमाणपत्र तयार करून अनेक जमिनी हडप केल्या असल्याचा प्रकार उघड होण्याची शक्यता आहे.

शेतकरी अस्मानी सुलतानी संकंटाचा सामना करीत आर्थिक अडचणींचा सामना करीत असून कर्जाच्या ओझ्याखाली दबत चालला आहे. तर दुसरीकडे त्यांच्या शेतजमिनी कवडीमोल भावात हडपण्यासाठी भूमाफिया टपून बसलेले आहेत. यासाठी भूमाफियांचे हस्तक अडल्या नडलेल्यांना हेरून भूमाफियांच्या दाराशी आणतात व त्यांची लुबाडणूक करतात, असा प्रकार मागील काही वर्षापासून सुरू आहे. संपूर्ण शहरात शेतजमिजीची खरेदी-विक्री करणारी भूमाफियांची एक टोळी आहे. एखाद्या सामान्य माणसाने काही अडचण आल्यास आपली जमीन विकायला काढली की तिची किंमत हेच महाशय नक्की करतात. त्यांनी नक्की केलेली किंमतीच्यावर कुणीच किंमत देऊ नका अशी भूमिका संगनमताने ही मंडळी घेत असते. त्यामुळे जमीन कितीही मोक्याच्या ठिकाणची असो ती कवडीमोल भावात घेतली जाते. एकदा जमिनीची किंमत ठरली की ही मंडळी सर्वांना मेसेज करून व्यवहाराबाबत कळवितात. जेणेकरून मार्केट मध्ये कुणी जागा घ्यायला तयार नाही अशी परिस्थिती निर्माण करून ठेवतात.

जमीन मालकाला अडचण असल्यामुळे त्याच्या मजबुरीचा गैरफायदा हे लोक घेतात. शेवटी जमीन मालक नाईलाजाने आपली लाख मोलाची जमीन कवडीमोल भावात विकायला तयार होतात. जमीन खरेदी झाल्यावर त्याच जागेवर फक्त दुकाने ऑफिससाठी हॉल, बँकेसाठी हॉल  अश्या प्रकारे बांधकाम करून कवडीमोल भावाने खरेदी केलेली जमीन किती तरी पटीने जास्त भावाने विकून लाखो रुपये कमवतात. असा हा गोरखधंदा मागील अनेक वर्षापासून चालत आलेला आहे. याच पैशातून  पुढची शिकार शोधून त्यांनाही वरीलप्रकारे अडचणीत आणून आपली संपत्ती वाढवतं गेले आहेत. जवळपास एकएकाच्या नावावर शेकडो एक्कर जमीन झाली आहे. तर भागीदारीत हजारो एक्कर जमीन झालीच असेल. शासनाचा कोणताच नियम ही मंडळी पाळताना दिसत नाही. उलट काही अधिकारी वर्गांना आपल्या पैशाच्या जोरावर नाचवून आपला उल्लू सीधा करताना  दिसून येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.