जळगावात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश ; ११ जण ताब्यात

0

जळगाव : शहरात ठिकठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आतापर्यंत ११ जणांना ताब्यात घेतले आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज एक हजारांच्या संख्येत आढळून येत आहेत. तर दुसरीकडे जिल्हयात करोना बाधितांवर उपचारासाठी आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा आहे. याचा फायदा घेवून काळ्याबाजारात रेमडेसिवीर इंजेक्शन विक्रीसाठी टोळी सक्रिय होती. तब्बल २५ हजार रुपयांत एक याप्रमाणे इंजेक्शनचा काळाबाजार असलेल्या शहरातील भास्कर मार्केट, रामानंदनगर, डॉमिनोझ पिझ्झा यासह इतर ठिकाणांहून ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी उशिरापर्यंत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात कारवाई सुरु होती. ताब्यात घेतलेल्यांच्या चौकशीनुसार यात मोठी साखळी सक्रिय असण्याची शक्यता आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनची शासकीय किंमत १२०० रुपये असताना तब्बल २५ हजार रुपयांत एक याप्रमाणे इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार गेल्या चार ते पाच दिवसांसून पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांच्यासह पथकाकडून याबाबत तपास सुरू होता. तपासात शहरात विविध ठिकाणाहून काही तरुण तब्बल २५ हजार रुपयांत या इंजेक्शनची विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले होते.

पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा यांनी उपलब्ध माहितीच्या आधारे गुरुवारी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांसह क्यूआरटी पथकातील कर्मचाऱ्यांचा फौजफाटा सोबत घेत शहरात डॉमिनोझ पिझ्झा, रामानंदनगर परिसरात रेल्वे रुळालगत, भास्कर मार्केट यासह इतर ठिकाणांहून पाच तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही जणांची नावे समोर आली. यानंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आले. शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत ११ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाली. उशिरापर्यंत पोलिसांची चौकशी सुरू होती. चौकशीअंती गुन्हा दाखल केला जाणार असल्याचेही पोलिसांकडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.