संगीतकार जोडी ‘नदीम-श्रवण’ मधील श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन

0

हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार जोडी नदीम-श्रवणमधील श्रवण राठोड यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते. नदीम-श्रवण या जोडीने अनेक गाजलेली गीते चित्रपट रसिकांना दिली. या जोडीने विशेषतः नव्वदीचा काळ गाजवला. मात्र, गुरुवारी या जोडीतील श्रवण यांचे निधन झाले. त्यांची कोरोनाविरुद्धची झुंज अपयशी ठरली.

याबाबत त्यांचा मुलगा संजीव राठोडने माहिती दिली. ‘माझ्या वडिलांचे आज निधन झाले. त्यांच्यावर उपचार सुरु होते, पण त्याला ते प्रतिसाद देत नव्हते. त्यांनी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला,’ असे संजीवने सांगितले.

श्रवण यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना माहीमच्या एस. एल. रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची अवस्था गंभीर असल्याचे सांगण्यात येत होते. रुग्णालयातील डॉक्टरांनीही त्यांची तब्येत स्थिर असली तरी चिंताजनक असल्याचे म्हटले होते. त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

नदीम सैफी आणि श्रवण राठोड यांनी मिळून अनेक गाजलेली गीते चित्रपट रसिकांना दिली. ही जोडी त्यांच्या आशिकी या चित्रपटातील गीतांमुळे विशेष लोकप्रिय झाली. त्यांनी दिल है के मानता नही, साजन, सडक, साथी, दिवाना, फुल और काटे, राजा हिंदुस्तानी यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. ‘श्रवणच्या निधनामुळे मला खूप दुःख झाले आहे. माझ्या आयुष्यात खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे,’ अशी प्रतिक्रिया नदीम यांनी आज दिली

Leave A Reply

Your email address will not be published.