भुसावळमध्ये रेमडेसिवीरची ब्लॅकमध्ये विक्री करणारे दोघे जाळ्यात

0

भुसावळ : कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने दुसरीकडे औषधं आणि ऑक्सिजनचा तुटवडाही जाणवत आहे. याचाच गैरफायदा घेण्याचा प्रयत्न होतोय. रेमडेसिवीर हे रुग्णांच्या उपचारासाठी उपयोगी ठरत असल्याने त्याचा काळाबाजार सुरू झाला आहे. अशात भुसावळ येथे कोरोना रुग्णांसाठी लागणार्‍या रेमडेसिवीर इंजेक्शनची तब्बल २० ते २५ हजारात विक्री करणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. बुधवारी दुपारी १ वजाता बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये ही कारवाई करण्यात आली. या दोघा संशयितांनी आतापर्यंत या माध्यमातून ३० ते ३५ नागरीकांना या इंजेक्शनची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी या कारवाईत लॅब चालक विशाल शरद झोपे (२८, बद्री प्लॉट, भुसावळ) व कर्मचारी गोपाळ नारायण इंगळे (१८, मानमोडी, ता.बोदवड) यांना अटक केली आहे. बद्री प्लॉटमधील ओम पॅथालॉजीमध्ये चढ्या दराने रेमडेसीव्हर इंजेक्शनची मिळत असल्याची तक्रार आल्यानंतर बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करण्यात आली व अचानक धाड टाकून आरोपींनी रुमालात गुंडाळलेले व एक फुटलेले इंजेक्शन आढळल्याने ते जप्त करण्यात आले. जप्त इंजेक्शनमध्ये शंभर एमजीचे हॅड्रा कंपनीचे तीन (प्रत्येकी किंमत ५४००) व रेमडीक कॅडीला कंपनीचे एक इंजेक्शन (किंमत ३४००) असे एकूण १९ हजार ६०० रुपयांचे इंजेक्शन जप्त करण्यात आले. पोलिसांना हॅड्रा कंपनीचे एक फुटलेले इंजेक्शन आढळले आहे.

कारवाईदरम्यान दोन पंचांना सोबत घेण्यात आले तर एफडी निरीक्षक अनिल माणिकराव यांनी इंजेक्शनची तपासणी करून ते अधिकृत असल्याचे सांगितले. बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिस चौकशीत लॅब मालकाने आतापर्यंत १५ ते २५ हजार रुपये दराने भुसावळात आतापर्यंत ३० ते ३५ हजारात रेमडेसिवीरची विक्री केल्याची माहिती दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.