शेंदुर्णीतील शतकोत्तर श्रीराम जन्मोत्सव सोहळा करोनामुळे यंदाही भाविकांच्या विना साजरा

0

शेंदुर्णी ता.जामनेर (प्रतिनिधी) : खान्देशातील विख्यात संतकवीतिलक वै.भीमराव मामा पारळकर यांच्या प्रेरणेने व स्व.गोविंदराव पारळकर यांनी गावकऱ्यांच्या सहकार्याने सुरू केलेल्या श्रीराम जन्मोत्सव सोहळ्याचे यंदाचे हे १०० वे वर्ष आहे .करोनामुळे यंदाही शासनाच्या नियमानुसार काही भाविकांच्या उपस्थितीत अतिशय साध्या पद्धतीने हा श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला.यंदा स्व.गोविंदराव पारळकर यांची अनुपस्थिती सर्वांना  चटका लावणारी होती.त्यांच्या आठवणीने अनेकांनी आपल्या अश्रुंना वाट मोकळी करून दिली होती.

सकाळी परंपरेनुसार काबरा परिवाराच्या वतीने सनी संजय जैन व सुरभी संजय जैन यांच्या हस्ते श्रीरामरायाच्या चरणी विधीवत अभिषेक पुजा करण्यात आली. दुपारी श्रीराम मंदिरात आकर्षक फुलांनी मंदिर व पाळणा सजविण्यात आला होता.यावेळी मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत करोनाचे नियम पाळत दुपारी १२ वाजता आरती करण्यात आली. महेशराव उदार व सौ.स्वाती उदार तसेच दिनेश पारळकर व सौ.शैलजा पारळकर यांच्या हस्ते आरती करण्यात आली. दोन वर्षापासुन करोनामुळे श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यातील सर्व धार्मिक कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने साजरा होत आहे. आरती झाल्यानंतर प्रसाद वितरण करण्यात आले. मंदिराच्या प्रांगणात यावेळी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या तर मंदिराच्या फलकावर करोनामुळे भाविकांनी घरबसल्या श्रीरामरायाची मनोभावे पुजा करून करोनाचे संकट कमी होण्यासाठी प्रार्थना करण्याचे आवाहन करण्यात आले होते. आज भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद करण्यात आले होते.

संध्याकाळी आकर्षक पणत्या लाऊन मंदिर सजविण्यात आले होते.यामुळे श्रीराम लक्ष्मण व सितामाई ,हनुमंत यांच्या मुर्ती फारच सुंदर दिसत होत्या. रात्री  शहरातुन सवाद्य निघणारी पालखी मिरवणुक सुद्धा रद्द करण्यात आली होती.तीन पिढ्यापासुन  विजय व तजय अग्रवाल यांच्या घरी  श्रीरामरायाची पालखी जात असते मात्र यंदा फक्त श्रीरामरायाची मुर्ती तेथे दर्शनासाठी नेण्यात आली तत्पुर्वी श्रीराम मंदिराच्या शेजारच्या प्रसिद्ध व्यापारी व उपक्रमशील शेतकरी राजेंद्र पाठक यांच्या घरी रामरायाची मुर्ती दर्शनासाठी नेण्यात आली होती.

भाविकांनी श्रीरामाचे मंदिर प्रशासनाने ठरवुन दिलेल्या नियमानुसार बंद करण्यात आले आहे तेव्हा घरातल्या घरात प्रभु रामरायाच्या चरणी प्रार्थना करुन करोनावर मात करण्याचे आवाहन श्रीरामचंद्र देवस्थानचे अर्चक दिनेश पारळकर व अँड. देवेंद्र पारळकर यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.