Video : नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीने प्रशासन हादरलं ; ३०-३५ रुग्ण दगावल्याची भीती

0

नाशिक : राज्यात एकीकडे ऑक्सिजनची कमतरता भासत असताना दुसरीकडे नाशिकमधील महापालिकेच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाल्याची धक्कादायक दुर्घटना झाली आहे.  गळती बंद करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहे. परंतु ऑक्सिजनचं प्रमाण कमी होत असल्यानं रुग्णालयातील ३०-३५ रुग्ण दगावल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

याबाबत असे की, नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाची एकच गर्दी पाहायला मिळाली. या रुग्णालयात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील ३० ते ३५ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.


तब्बल २ तासानंतर नाशिक महापालिका आयुक्तांनी रुग्णालयस्थळी भेट दिली. ऑक्सिजन गळती प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी केली जाईल. हलगर्जीपणा करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. १० ते ११ रुग्ण मृत्यू पडल्याची शक्यता असल्याचं महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितलं. तर शिवसेनेच्या सुधाकर बडगुजर यांनी रुग्णालयाला भेट दिली त्यानंतर या घटनेमुळे ३०-३५ रुग्ण दगावल्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.

हॉस्पिटलमध्ये साधारणपणे १५० रुग्ण आहेत. ऑक्सिजन गळती होत असल्याने रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा हळूहळू संपत चालला आहे. त्यामुळे आणखी रुग्ण दगावण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन गळती रोखण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. या दुर्घटनेत १०-११ रुग्णांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असली तरी आणखी रुग्ण दगावण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. ऑक्सिजन नसल्याने रुग्णांची प्रकृती खालावत चालली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.