दुकाने बंद ठेवण्याचे आदेश तात्काळ रद्द करावे ; जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळाची मागणी

0

जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या निर्बंधामुळे जवळपास सर्वच दुकाने बंद आहेत. गेल्या वर्षभरापासून व्यापारी बांधव अगोदरच संकटात आला असून या निर्णयामुळे व्यापाऱ्यांच्या भावनांचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. सर्व व्यापारी नियमांचे पालन करून व्यवसाय करण्यास तयार असून दुकाने बंदचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अशी मागणी जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

जळगाव जिल्हा व्यापारी महामंडळातर्फे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे, पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील, खासदार उन्मेष पाटील, आ.सुरेश भोळे, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना निवेदन पाठविण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रशासनाने लागू केलेले लॉकडाऊन व त्याअंतर्गत देण्यात आलेले दुकाने बंद ठेवण्याचे आदेश अत्यंत अन्यायकारक व निषेधार्ह आहे. कोरोना महामारीमुळे आधीच वर्षभरापासून पिचलेल्या व्यापारी बांधवांच्या अंताची परीक्षा पाहणारे आहे. या निर्णयांमुळे समस्त व्यापारी बांधवांमध्ये संतप्त व आक्रोशाची भावना निर्माण झाली असून दुकाने बंद ठेवण्याचा जाचक निर्णय मागे न घेतल्यास या भावनांचा उद्रेक होणे स्वाभाविक आहे. लॉकडाउनच्या निर्णयाने आणखी आर्थिक संकटात सापडलेल्या व्यापारी बांधवांची अडचण समजून घेऊन दुकाने सुरु करण्याचा आदेश आपण तात्काळ द्यावा. नियमांचे यथोचित पालन करून सेवा देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू, असे निवेदनात म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.