फडणवीस मला ज्युनिअर, विरोधी पक्षाच्या ‘त्या’ कला मलाही अवगत, खडसेंचा फडणवीसांना टोला

0

अहमदनगर : राज्यात होत असलेल्या घडामोडीवर भाष्य करताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आधी छोटा आरोप करायचा, मग कोणाला तरी पुढे करुन तक्रार करायला लावायची, मग त्यांची चौकशी सरु करायची. असे करत असताना एखाद्याला पूर्ण बदनाम करायचे. अरोपामध्ये तथ्य नसले तरी मीडिया आणि यंत्रणांच्या मदतीने प्रकरण पेटलेले ठेवायचे, या विरोधकांच्या कला असतात. यासाठी खूप बुद्धीमत्ता लागते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सध्या तेच करीत आहेत. मी ही बराच काळ विरोधी पक्षात होतो, त्यामुळे या कला मला अवगत आहेत. माझ्या तुलनेत फडणवीस ज्युनिअर आहेत, असा टोला खडसे यांनी लगावला.

एकनाथ खडसे नगर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत राजीनाम्याची मागणी केली. यावर थेट उत्तर देणे खडसे यांनी टाळले. मात्र पैशांच्या मागणीवर बोलताना ते म्हणाले, परमबीर सिंह यांनी पदावर असताना आरोप करायला पाहिजे होते. पोलिसांत बदल्यांसाठी पैसे घेतले जातात, हा नेहमीचा चर्चेचा विषय आहे. मात्र, पोलिसांच्या बदल्या करण्यासाठी आस्थापना मंडळ असते. त्यांच्याशिवाय पोलिसांच्या बदल्या होत नाहीत. या मंडळामध्ये वरिष्ठ अधिकारी असतात. बदलीसाठी पैसे घेतल्याचा आरोप होत असेल तर मग हे त्या आस्थापनाच्या मंडळासाठी होतो आहे का ? याची चौकशी झाली पाहीजे, असे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

खडसे पुढे म्हणाले, पोलिसांच्या बदल्यांच्या नियमानुसार गृहमंत्री एखाद्या एपीआयची देखील बदली करु शकत नाहीत. पोलिसांची बदली करण्याचा अधिकार फक्त आस्थापना मंडळाचा असतो. मी तीस वर्षे विधिमंडळात असल्याने मला याची संपूर्ण माहिती आहे. केवळ मंत्र्यांना बदनाम करण्यासाठी विरोधकांकडून असे कार्यक्रम केले जातात. असे कार्यक्रम नियोजनबद्ध होण्यासाठी खूप मोठी बुद्धीमत्ता लागते. सध्या देवेंद्र फडणवीस हेच काम करत असून माझ्यावेळी देखील हेच झाले. कोणाला तरी आरोप करायला लावले आणि नंतर तक्रार झाली, मग चौकशीमध्ये तथ्य नसल्याचे समोर आले. सध्याही असेच सुरु आहे, असे म्हणत खडसे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

Leave A Reply

Your email address will not be published.