ठेकेदारांमुळे खामगावचे वैभव वांध्यात ; नटराज गार्डनचे सुशोभिकरण रखडले

0

खामगाव (गणेश भेरडे): नगर परिषदेतील बांधकाम विभागात अधिकार्‍यांपेक्षा ठेकेदारांचा हस्तक्षेप वाढल्याने शहराच्या विकासाची वाट लागत असून खामगावचे वैभव वांध्यात आले आहे. मागील दीड वर्षापूर्वी सुमारे दीड कोटी खर्चाचे मंजूर झालेले नटराज गार्डनच्या सुशोभिकरणाचे काम ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे रखडले असल्याचा आरोप होत असून याबाबत झालेल्या तक्रारींमुळे सदर प्रकरण जिल्हादंडाधिकारी यांच्याकडे न्यायप्रविष्ट असल्याचे समजते.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार शहरातील जुुने वैभव असलेल्या नटराज गार्डनच्या सुशोभीकरणाचे काम सन 2019 मध्ये सुरू करण्यात आले होते. परंतुु संबंधित ठेकेदारांनी कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी झाल्या. त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पाडणार्‍या या विकास कामाला ठेकेदारांची अनियमितता कारणीभूत ठरली. सदर काम गुरू कंस्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आले होते. परंतु संबंधित ठेकेदाराने मंजुर नकाशाऐवजी उद्यानात मनमानी बांधकाम सुरू केले होते. जणूकाही उद्यानात सिमेंटचे जंगल उभारण्यात येत असल्याचे दिसून येत होते. तर या कामापोटी संबंधित ठेकेदाराला काही रक्कम ही अदा करण्यात आल्याचे बोलले जात आहे. शासनाच्या पर्यायाने जनतेच्या पैशाचा अपव्यय करणार्‍याविरूध्द कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. एकंदरीत ठेकेदारांचा मनमानी कारभार शहराच्या विकासात खिळ घालत असल्याचे दिसून येत असून न.प. प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप होत आहे.

नागरिकांची अशीही दिशाभूल

नटराज गार्डनच्या मुख्य प्रवेशव्दारावर आजही मागील वर्षीच्या लॉकडाऊन काळातील जुना बोर्ड झळकत आहे, त्यामध्ये नमूद मजकूर असा- लॉकडाऊनमुळे बगीचा बंद आहे आणि बगिच्याचे नुतनीकरणाचे काम सुरू असल्याने कामाशी संबंधित व्यक्ती, कर्मचारी, अधिकारी तसेच सन्माननीय सदस्य व पदाधिकारी व कोणीही आत येवू नये. आदेशावरून मुख्याधिकारी नगर परिषद, खामगाव.

यासंदर्भात आज 24 मार्च रोजी न.प. मुख्याधिकारी मनोहरराव अकोटकर यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, नटराज गार्डनचे कामासंबंधी टाऊन प्लॅनिंगकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे सध्या काम बंद आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.