जळगाव जिल्ह्यातील रात्रीच्या संचारबंदीमध्ये १५ मार्चपर्यंत वाढ

0

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा डोख वर काढले आहे. दिवसेंदिवस मोठ्या संख्येने रुग्ण आढळून येत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने खबरदारी म्हणून जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी रात्रीच्या संचारबंदीमध्ये १५ मार्चपर्यंत वाढ केली आहे. त्यासोबत शाळा, कॉलेज, क्लोसेस बंद राहणार आहेत. पूर्वी हे आदेश आजपर्यंत (ता.६) होते. त्याची मुदत पंधरा मार्चपर्यंत वाढविली आहे.

 

सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्रे, खासगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस बंद राहतील. ऑनलाइन शिक्षणाची सुविधा देता येईल. या कालावधीत जर परीक्षा असतील तर त्या घेता येणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरिता संबंधित शाळा/महाविद्यालयात उपस्थित राहता येईल. अभ्यासिका (लायब्ररी व वाचनालये) यांना केवळ ५० टक्के क्षमतेच्या मर्यादेत सुरू ठेवता येतील.

 

यावर राहील बंदी…

* धार्मिक कार्यक्रम, जत्रा, यात्रा, उरूस, दिंडी

* सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, पार्क, बगीचे, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे

* सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम

* क्रीडा स्पर्धा, प्रदर्शने, मेळावे, संमेलन

* सर्व आठवडेबाजार बंद

* निदर्शने, मोर्चे, रॅली

* बाजार समित्यांकडे किरकोळ विक्रेत्यांना बंदी

* सर्व धार्मिक स्थळे एकावेळेस केवळ दहा लोकांच्या मर्यादित उपस्थितीत संबंधित पूजा-अर्चा यांसारख्या विधीसाठी खुली राहतील.

 

वैधानिक सभांना परवानगी

कायद्याद्वारे बंधनकारक असणाऱ्या वैधानिक सभांना केवळ ५० लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेत परवानगी राहील. तथापि, याबाबत संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचित करणे आवश्यक राहील. मात्र जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा व जळगाव शहर महापालिका सर्वसाधारण सभा यांना उपस्थितीच्या संख्येच्या मर्यादेतून सूट राहणार आहे.

 

लग्नात केवळ ५० जणच!

लग्नसमारंभ, कौटुंबिक कार्यक्रम यांचे आयोजन करताना या कार्यालयाकडून लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचा भंग होणार नाही, याची संबंधितांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी.

Leave A Reply

Your email address will not be published.