सहा हजार रुपयांची लाच घेताना कंत्राटी वायरमनसह तंत्रज्ञ जाळ्यात

0

जळगाव | तालुक्यातील विदगाव येथील युवकाला डिमांड नोट भरलेली असतानाही वीजजोडणी देण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच घेताना कंत्राटी वायरमनला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. त्याच्यासह लाचेची मागणी करणाऱ्या विदगाव सबस्टेशनच्या वरिष्ठ तंत्रज्ञालाही एसीबीने ताब्यात घेतले आहे. ही कारवाई तालुक्यातील अमोदा खुर्द येथील तक्रारदाराच्या शेतातील जत्रा नावाच्या हॉटेलमध्ये करण्यात आली. रात्री ११ वाजून १९ मिनिटांनी एसीबीने याबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली.

 

महावितरण कंपनीचा विदगाव सबस्टेशनचा वरिष्ठ तंत्रज्ञ रवींद्र धनसिंग पाटील (वय ४७, रा. एमएसइबी कॉलनी) जळगाव व वायरमन प्रल्हाद उत्तम सपकाळे (वय ४१ रा. विदगाव) असे त्या दोघा लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदाराने वीज जोडणी मिळण्यासाठी महावितरणच्या जळगावच्या कार्यालयात डिमांड नोट भरलेली आहे. त्यांची वीजजोडणी देण्यासाठी वरिष्ठ तंत्रज्ञ पाटील व कंत्राटी वायरमन सपकाळे यांनी शुक्रवारी तक्रारदाराकडे साक्षीदारांमार्फत ७ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. शेवटी ६ हजार रुपयांवर तडजोड झाली. त्याबाबत त्यांनी तात्काळ एसीबीकडे तक्रार केली. त्यानंतर सापळा रचण्यात आला.

तक्रारदाराची अमोदे खुर्द येथील शेतात जत्रा नावाचे हॉटेल आहे. त्यांनी पाटील व सपकाळे याला हॉटेलवर बोलविले होते. तेथे कंत्राटी वायरमन सपकाळेला तक्रारदाराकडून ६ हजार रुपयांची लाच घेताना एसीबीचे उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने रंगेहात पकडले. त्यांच्याविरुध्द जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Leave A Reply

Your email address will not be published.