मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या कार मालकाचा आढळला मृतदेह

0

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकानंतर आता नवी धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण जी स्कॉर्पिओ अंबानींच्या घराबाहेर सापडली होती, त्या गाडीमालकाचा मृतदेह सापडला आहे. मनसुख हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर भागात सापडला आहे. त्यामुळे एकच खळबळ माजली आहे.

 

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला आहे. मनसुख हे ठाण्यातील नौपाडा येथे राहत होते. आज सकाळी१०.२५ मिनिटांनी मनसुख यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नौपाडा पोलिस ठाण्यात आज दुपारी मनसुख बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी केली होती.

 

मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ 25 फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून  आल्याने तपास यंत्रणा अलर्ट झाली होती. ही घटना उघडकीस येताच या घटनेचा तपास क्राईम ब्रांचच्या सीआययु युनिट कडे देण्यात आला होता.

 

तपासात ती कार मुलुंड उड्डाणपुलाखालून चोरी केल्याची माहिती समोर आली. याबाबत विक्रोळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर ठाणे परिसरात राहणारे हिरेन मनसुख यांची ही स्कॉर्पिओ असल्याचं तपासात आढळून आलं.

 

लॉकडाऊनमुळे कार बरेच दिवस बंद होती. दरम्यान, १७ फेब्रुवारी रोजी ऑपेरा हाउस येथे काम असल्याने त्यांनी कार दुरुस्त करून घेतली. दुपारच्या सुमारास ऐरोली ब्रिजपर्यंत पोहोचताच कारचे स्टेअरिंग जाम झाल्यामुळे तेथीलच सर्विस रोडवर ती पार्क करून मनसुख पुढे निघून गेले. १८ फेब्रुवारी रोजी कार पार्क केलेल्या ठिकाणी गेल्यावर कार तेथे नसल्याने विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. स्कॉर्पिओ जुनी असल्यामुळे जुन्या वाहनाच्या काचेवरील कोपऱ्यात वाहनाचा क्रमांक टाकण्यात आला होता. आरोपींनी वाहनाची ओळख पटू नये म्हणून कारचा चेसिस आणि इंजीन क्रमांक घासला होता. पण, काचेवरील क्रमांकामुळे कारची ओळख पटली. तपासात ती चोरी झाल्याचे समजताच पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी सुरू केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.