मध्य रेल्वेचा दणका ;प्लॅटफॉर्म तिकीट दरात मोठी वाढ

0

मुंबई : राज्यात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यानंतर सरकारी यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत. रेल्वे स्टेशनवरील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दरात पाच पट वाढ केली आहे.त्यामुळे आता प्लॅटफॉर्म तिकिटासाठी १० रुपयांऐवजी थेट ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

 

मुंबई महानगर प्रदेशातील महत्वाच्या रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म तिकीट दरात मध्य रेलवेने वाढ केली आहे. मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये केले आहे. काही निवडक स्टेशनवरील अनावश्यक गर्दी कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे मध्य रेल्वेने म्हटलं आहे.

 

विशेषतः ज्या स्टेशनवर बाहेरगावी जाणाऱ्या मेल एक्स्प्रेसना थांबा आहे, अशा स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीट दर ५० रुपये करण्यात आला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर , लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, पनवेल, भिवंडी रोड या स्टेशनवर आता प्लॅटफॉर्म तिकिटासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत.

 

बाहेरगावी जाणारे प्रवाशी आणि त्यांचे नातलग रेल्वे स्थानकांवर गर्दी करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात करोना संसर्ग वाढला आहे. रेल्वे स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकीट दर ५० रुपयांपर्यंत वाढवला असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले. गेल्या २४ फेब्रुवारीपासून ही दरवाढ लागू झाली असल्याचे त्यांनी सांगितले. सुट्टीच्या हंगाम संपेपर्यंत म्हणजेच १५ जून २०२१ पर्यंत मध्य रेल्वेच्या महत्वाच्या स्टेशनवर प्लॅटफॉर्म तिकीटाची दरवाढ लागू राहील, अशी माहिती त्यांनी दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.