भुसावळ जिल्ह्यात 2 लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये संपर्क

0

भुसावळ | प्रतिनिधी 

अयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण देशभर निधी संकलन अभियान राबविण्यात आले. देशभरात सुमारे 10 लाख रामसेवकांनी यात प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. अभियानामध्ये घरोघरी जावून श्रीराममंदिर निर्माण हा विषय जनसामान्यापर्यंत पोहचवला. अभियानात देशातील सर्व जाती पंथ, धर्म संप्रदायाच्या लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

भुसावळ उपजिल्ह्यात महामंडलेश्‍वर श्री जनार्दन हरीजी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली स्वागत समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यात जिल्ह्यातील सर्व साधू संत,उद्योजक, व्यापारी वर्गातील लोक सहभागी झाले होते. अभियान सामान्य लोकांपर्यंत व्यवस्थित पोहचावे म्हणून तालुका, ग्राम, वस्ती स्तरावर विविध समित्यांची स्थापन करण्यात आली होती. त्या अनुषंगाने अनेक समित्या कार्य करीत होत्या.

अभियानात अनेक चांगले अनुभव आले. त्यातीलच एक रावेर येथील कोष्टी काकांचा अनुभव हा अद्वितीय असा होता. त्यांची क्लिप व्हायरल झाल्यानंतर देशातील अनेक वरिष्ठ नेत्यांनी, पदाधिकार्‍यांनी त्याची दखल घेवून ते ट्विटर, फेसबुक, व्हाटसअपच्या माध्यमातून देशभर पोहोचवले. अभियानात सर्वच धर्म, जात, पंथ, संप्रदायाच्या लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

भुसावळ उपजिल्ह्यात दिनांक 15 फेब्रुवारी रोजी अभियानाच्या शेवटच्या दिवशी आलेल्या माहिती  नुसार भुसावळ, यावल, रावेर,  बोदवड, मुक्ताईनगर, जामनेर, अश्या  तालुक्यात राबविण्यासाठी 11,067 रामभक्तांनी सहभाग नोंदविला.

जिल्ह्यातील 563 गावे, 79 वस्त्याशी प्रत्यक्ष संपर्क करण्यात आला. त्यांच्या माध्यमातून 2,14,463 कुटूंबा पर्यंत संपर्क करण्यात आला. प्रत्येक घरापर्यंत पोहचवून त्यांना राम मंदिरासंदर्भात सविस्तर माहिती सांगून 2 कोटी 60 लाख रुपये रक्कम जमा करून श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट यांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आली आहे. अभियानात ठिक ठिकाणी घरोघरी रामभक्तांचे जोरदार स्वागत करण्यात आले. आज दि. 28 फेब्रुवारी रोजी श्रीराम मंदिर निर्माण समर्पण समिती भुसावळ  विसर्जित करण्यात आली.

आता अभियान संपल्यामुळे भुसावळ उपजिल्ह्यात राम मंदिर च्या नावाने निधी संकलन करण्यास कोणी आले तर कृपया निधी देऊ नये असे आवाहन अभियान प्रमुख योगेश भंगाळे  यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.