तोरणमाळ घाटात जीप कोसळल्याने ६ मजुरांचा जागीच मृत्यू

0

धुळे: नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ घाटात एका जीपला झालेल्या भीषण अपघातात ६ मजूर जागीच ठार झाले आहेत. तर काही जण जखमी झाले आहेत. या घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. जखमींना तोरणमाळ येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

धडगाव तालुक्यातील सातपुड्यातील दुर्गम भागातील तोरणमाळ घाटातील खडकी रस्त्यावर मजुरांना घेऊन जाणारी जीप ७० ते ८० फूट खोल दरीत कोसळली आहे. यात ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जीपमध्ये ३१ जण असल्याची माहिती घटनास्थळी दाखल असलेल्या नागरिकांकडून मिळाली आहे.

 

हे मजूर महाराष्ट्र-मध्यप्रदेश राज्यातील सीमावर्ती भागातील खडकी गावातून तोरणमाळ येथे कामाला जात असताना अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मजूर घेऊन जाणारी जीप ७०-८० फूट खोल दरीत कोसळल्याने मजूर झाडात दगडावर जोरदार आदळल्याने त्यांचा मृत्यू झाला. यात लहान मुलीचा देखील समावेश आहे. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केले आहे. जखमींना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर घटनास्थळी म्हसावाद पोलिसांचे पथक दाखल झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.